पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

धर्मत्याग केला. पण हिंदुसमाज या आपत्तीविषयी उदासीनच आहे. गेली हजार वर्षे तो तसाच होता व अजूनही, काही अपवाद वजा जाता, बहुसंख्य हिंदु जनतेच्या वृत्तीत फारसा फरक पडला आहे असे दिसत नाही. प्राचीन काळी जिवंत, चैतन्यसंपन्न असलेल्या या समाजाला ही शववृत्ती, ही संज्ञाहीनता, ही बधिरता, ही जडता, ही निर्बुद्धता उत्तरकाळच्या धर्मशास्त्रामुळेच आलेली आहे. गुणांची प्रतिष्ठा जाऊन जन्मालाच सर्व महत्त्व कसे येत गेले ते धर्मशास्त्रातील वचनांच्या आधारे आता पाहू.

ब्राह्मणमाहात्म्य :
 तैत्तिरीय ब्राह्मण, महाभारत, मनुस्मृती, वसिष्ठधर्मसूत्र, विष्णुधर्मसूत्र, पराशरस्मृती अशा जुन्या धर्मग्रंथांतून ब्राह्मणांची पुढीलप्रमाणे अतिरेकी स्तुती केलेली आढळते. "ब्राह्मण हा अग्निवैश्वानर आहे, ब्राह्मण हे मूर्त देव होत, ब्राह्मण हेच विश्वाचा आधार होत, विश्वातील सर्व धन त्यांचे आहे, ब्राह्मण संतप्त झाला तर प्रतिविश्व निर्माण करील, दिक्पाल निर्माण करील व देवांनाही स्थानभ्रष्ट करील; व्रत, तप, यज्ञ यांत कोठे काही उणे पडले तर ते ब्राह्मणकृपेने भरून निघते, ब्राहाणाचा शब्द म्हणजे देवाचा शब्द, तो कधीच खोटा ठरत नाही, सर्व प्राणिमात्रांचा ब्राह्मण हा गुरू होय; ब्राहाण म्हणजे श्रेष्ठ तप, श्रेष्ठ ज्ञान, त्यांच्या अर्घ्यदानामुळेच आकाशात सूर्य प्रकाशतो, ब्राह्मणांनी यज्ञ केले नाहीत तर सूर्य उगवणेच शक्य नाही. पुरोहितांच्या मंत्रसामर्थ्यानेच राजांना जय मिळतो, कोणालाही देवपद देणे व देवपदावरून कोणालाही च्युत करणे हे ब्राह्मणांच्या हाती आहे, त्यांच्या इच्छेप्रमाणेच राजांना राजपद मिळते वा असलेल्यांचे राजपद जाते." (म. म. काणे, धर्मशास्त्राचा इतिहास, खण्ड २ रा, पृ. १३५-३६) ज्ञानी, तपोनिष्ठ, वेदोनारायण अशा ब्राह्मणांची जरी अशी स्तुती केली तरी ती सार्थ ठरणार नाही, हास्यास्पदच ठरेल. मग सरसकट सर्व ब्राह्मणांना उद्देशून असली स्तोत्रे रचली तर काय होईल हे सांगावयास नकोच. दुर्दैवाने वरील ग्रंथांतील ही स्तुती गुणकर्माची नाही. जातीची आहे. काही ठिकाणी तसे स्पष्टपणे सांगितलेलेही आहे. 'ब्राहाण: संभावेनैव देवानां अपि दैवतम् ।' केवळ जन्मानेच ब्राह्मण देवांचे दैवत ठरतो, असे मनु म्हणतो. (११- ८४) याही पुढे जाऊन त्याने म्हटले आहे की, 'ब्राह्मण विद्वान