पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
७७
 

आहेत. त्यांचा निर्देश मागे केलाच आहे. क्षत्रियांनी ही विद्या ब्राह्मणांना शिकविली हे खरे; पण ती देताना, हे प्रतिलोम आहे, विपरीत आहे, असे क्षत्रियांनी उद्गार काढल्याचे दिसते. ब्राह्मणाने क्षत्रियाकडे विद्येसाठी जावे, हे अजातशत्रु राजाला प्रतिलोम वाटत होते. याचा अर्थ असा की ब्राह्मण, क्षत्रिय हे जन्माने ठरत होते. कवष ऐलूषाची कथा अशीच आहे. यज्ञदीक्षा घेऊन तो ब्राह्मणांमध्ये बसला होता. हे ध्यानी येताच, 'तू दासीपुत्र आहेस, येथून चालता हो' असे म्हणून ब्राह्मणांनी त्याला एका वाळवंटात हाकून दिले. पण तेथे त्याने सरस्वतीची प्रार्थना केली. तेव्हा ती नदीरूपाने धावत आली. त्याची ती प्रार्थना म्हणजेच ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातले ३० वे सूक्त होय. (काणे, धर्मशास्त्र, खण्ड २ रा, पृ. ३६-६८ )
 या दोन्ही कथा उद्बोधक आहेत. वर्ण जन्माने ठरत होते असे त्या दर्शवितात. पण गुणकर्मानुसार मनुष्याला प्रतिष्ठा मिळत होती, पूर्वग्रह बाजूला सारून लोक गुणांना मान देत होते, असेही त्यावरून दिसते. गुणांची ही प्रतिष्ठा पुढेपुढे अमान्य होऊन जन्माची वाढत गेली. आणि त्यामुळेच समाज पराकाष्ठेचा विषम होऊन त्याची अनंत शकले झाली. अशा समाजामध्ये एकरूप समाजासारखी संघटना होणे अशक्य असते. आणि म्हणूनच त्याच्या ठायी सामर्थ्य निर्माण होत नाही. यापेक्षाही जास्त हानिकारक गोष्ट म्हणजे गुणकर्माला मान न देणाऱ्या समाजात व्यक्तिजीवनाची प्रतिष्ठा राहात नाही. आणि व्यक्तिजीवनाची प्रतिष्ठा हा तर उत्कर्षाचा मूळ पाया होय. प्रतिष्ठा नाही म्हणजे उत्कर्षाला संधी नाही. आणि ती नाही म्हणजे व्यक्ती समाजाच्या उत्कर्षापकर्षा- विषयी उदासीन होते. स्वतःच्या धर्माविषयीही ती उदासीन होते. अभ्युदय व निःश्रेयस प्राप्त करून देणारा तो धर्म. पण यांचा लाभ ज्या धर्मात होत नाही त्या धर्माविषयी लोकांना प्रेम का वाटावे ? त्यांची धर्मांतर करण्याची प्रवृत्ती झाली तर त्यांना दोष कसा देता येईल ? कुमारिल भट्टाने म्हटले आहे की, शुद्रांतूनच बहुसंख्य लोक बौद्ध झाले आहेत. हे जाणूनच त्या वेळी पुराणांनी शुद्रांना काहीसा धर्माधिकार दिला. पण पुढे तो पुन्हा काढून घेण्यात आला. आजच्या काळातही डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी हिंदुधर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला याचे कारण हेच आहे. या धर्मात राहून आपल उत्कर्ष होणार नाही ही त्यांची खात्री झाली म्हणूनच त्यांनी