पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

१६२३) स्पर्शबंदी (अस्पृश्यता), बेटीबंदी (जातिभेद), शुद्धिबंदी, व्यवसायबंदी, रोटीबंदी, वेदबंदी, व सिंधुबंदी या सावरकरांनी सांगितलेल्या सात श्रृंखला होत. यांतील प्रत्येक बंदीचे पर्यवसान समाजाची शकले करणे, त्याची विघटन करणे यातच झाले व अजूनही होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या शृंखलांना स्वदेशी श्रृंखला म्हटले आहे. मागल्या लेखात सांगितले आहे की, हिंदू शास्त्रीपंडितांनीच असले धर्मशास्त्र रचून आपला समाज धुळीस मिळविला. या शृंखला स्वदेशी आहेत या म्हणण्याचा हाच भावार्थ आहे. आमच्या आम्हीच या श्रृंखला घडवून त्यांनी हिंदु- समाजातील भिन्न घटकांना निरनिराळ्या खांबांशी जखडून ठेविले व एकमेकां- जवळ येणे अशक्य करून टाकले. त्यामुळे हा समाज समाज राहिलाच नाही. हिंदु मानवसमूहात व्यक्ती आहेत, जाती आहेत; पण त्या सर्व मिळून एक समाज होत नाही. खरे म्हणजे जाती याही इतरांच्या विद्वेषापुरत्याच आहेत. त्यांच्या अंतरात सर्व विलग, अबद्ध, असंघटित अशा व्यक्तीच आहेत. अशी या मानव- समूहाची दुर्दशा का झाली याची अनेक कारणे वर उल्लेखिलेल्या थोर पंडितांनी दिली आहेत. त्यांचाच आता प्रपंच करावयाचा आहे. हिंदुधर्मीयांनी इ. स. १० व्या शतकाच्या आगेमागे अत्यंत विपरीत असे तत्त्वज्ञान स्वीकारले, अत्यंत हानिकारक व घातक अशी धर्माची व समाजरचनेची तत्त्वे स्वीकारली म्हणून त्यांचा नाश झाला असे मागल्या लेखात सांगितले आहे. हे धर्मशास्त्र ज्यांनी रचले त्यांनी व त्यांच्या अर्वाचीन पुरस्कर्त्यांनी त्याचे समर्थनही केले आहे. त्या विपरीत धर्मशास्त्राचा इतिहास पाहताना त्याच्या समर्थकांनी मांडलेल्या. उपपत्तींचाही आपण परामर्श घेऊ.

विषमता :
 मागल्या प्रकरणात सांगितलेच आहे की समता आणि विषमता यांचा पुरस्कार करणाऱ्या दोन परपस्परविरुद्ध विचारसरणी प्रारंभीच्या काळापासून प्रचलित होत्या. त्यातील समतेच्या प्रवाहाचा विचार त्या लेखात आपण केला. आता विषमतेच्या दुसऱ्या प्रवाहाचा मुळापासून मागोवा घेत त्याच्या मुखापर्यंत जाऊन त्याच्यामुळे हिंदुसमाज शतधा छिन्नभिन्न कसा झाला ते पाहावयाचे आहे.
 उपनिषदांमध्ये ब्राह्मणांनी क्षत्रियांपासून ब्रह्मविद्येचे पाठ घेतल्याचे अनेक उल्लेख