पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
७५
 

इत्यादी कारणे हिंदूंच्या अधःपाताची म्हणून त्यांनी दिलेली आहेत. (भाग ३ रा, पुस्तक ७ वे, प्रकरणे २५, २६; पुस्तक ८ वे, प्रकरण ४)
 हे सर्व विवेचन वाचीत असताना एक गोष्ट ध्यानात येते की यांतील प्रत्येक रूढी ही हिंदुसमाजाच्या विघटनेस कारण झालेली आहे. पूर्वीच्या काळी हिंदुसमाजातील भिन्न घटक एकमेकांशी संलग्न करण्याचे, सांधण्याचे, त्यांना एकरूप देऊन संघटित करण्याचे शास्त्रज्ञांचे धोरण होते व ते प्रभावी ठरले होते. आता एक वर्ण दुसऱ्या वर्णापासून, एक जात दुसऱ्या जातीपासून, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून तोडून काढण्याचे धर्मशास्त्रकारांनी धोरण आखले होते. त्या धोरणाचाच प्रभाव वाढून अखेरीस हिंदुराजसत्तांचा, धर्माचा व संस्कृतीचा उच्छेद होण्याची वेळ आली.
 तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांनी 'हिंदूंच्या अवनतीची मीमांसा' या पुस्तकात 'पावित्र्याच्या अतिरेकी कल्पना', 'सामुदायिक ध्येयाचा अभाव' इ. या अवनतीची कारणे दिली आहेत. आणि शेवटी यामुळे हिंदुसमाजात 'स्वकीय- दूरीकरण प्रवृत्ती' बळावून त्याची अवनती झाली, असा निष्कर्ष काढला आहे. (पृ. १३१)
 आचार्य क्षितिमोहन सेन यांनी आपल्या 'भारतवर्ष में जातिभेद' या आपल्या पुस्तकात 'हमारा इतिहास इसी प्रकार अपनों को पराया बनानेका इतिहास है' असा एका वाक्यातच भारताच्या अधःपाताविषयी निर्णय दिला आहे. (पृ. ३१) आपल्यापेक्षा दुसऱ्याला हीनजातीय ठरवावे, शूद्र ठरवावे, पतित ठरवावें, अपवित्र लेखावे आणि तोडून दूर फेकावे, यातच लोक कृतार्थता मानू लागले होते. त्यातून विघटनेवाचून दुसरे काय होणार ?
 म. म. काणे यांनी आपल्या 'धर्मशास्त्राचा इतिहास' या ग्रंथाच्या पाचव्या खंडात हिंदूंच्या अधःपाताची अशीच कारणचिकित्सा केली आहे. ती करताना निवृत्तिवाद, इहविन्मुखता, राजकारणाविषयीची उदासीनता, सर्व समाजाला बांधील अशा सम आचारविचारांचा, धर्मबंधनांचा अभाव ही कारणे त्यांनी दिली आहेत. आमची अध्यात्मतत्त्वे पाहिली तर ती जगदैक्य, भूतैक्य प्रतिपादणारी; आणि प्रत्यक्षात मात्र अनंत प्रकारचे भेदभाव, अशी विपरीतता आमच्या बुद्धीला आली होती. हे विवेचन करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेल्या सप्तशृंखलांचा त्यांनी, अधःपाताची कारणे म्हणून, निर्देश केला आहे. (पृ. १६२०-