पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

शतकानुशतक हे स्वातंत्र्य अभंग राखिले आहे,' असे अभिमानाने ते सांगत होते. (कर्टिस) अंबष्ठ गणराज्याबद्दल कर्टिसने म्हटले आहे की, 'शौर्यधैर्यात व लष्करी बळात या राज्यातील लोक भारतातील इतर प्रदेशांपेक्षा अणुमात्र कमी नव्हते. आणि त्याचे शासन लोकायत्त होते.' पंजाबातील गणराज्यांविषयी डियोरस म्हणतो, 'अनेक पिढ्यानंतर अनियंत्रित राजसत्ता या लोकांनी नष्ट केली व लोकायत्त शासने स्थापन केली. त्यानंतर इतरत्रही अनेक नगरांनी लोकशासनाचाच अवलंब केला.' (पृ. ६०, ६१, ६४, ६७, ७५)
 या वर्णनावरून भारताच्या गणराज्यांतील समानतेची कल्पना येईल. सर्व नागरिक जेथे स्वयंशासनाचे अभिमानी असतात, प्रत्येकाला जेथे मताधिकार असतो, स्त्री-पुरुषांना जेथे विवाहस्वातंत्र्य असते तेथे चातुर्वर्ण्यातील विषमता कितपत नांदू शकेल हे सांगावयास नको. या गणराज्यांमध्ये सर्व जनता शस्त्रधारी असून त्यांची लोकसेना (नेशन इन् आर्मस्) स्वातंत्र्यरक्षणासाठी सदैव सिद्ध असे. त्यामुळेच ही गणराज्ये समर्थ व बलाढ्य होती. सर्व जनता हीच सेना असलेल्या राज्यात जन्मनिष्ठ विषमता नांदणे फार कठिण आहे. आणि तशी ती नांदत नव्हती, तेथे समता होती, हे महाभारतकरांनीच सांगितले आहे. भीष्म म्हणतात, की या गणराज्यात 'जात्या च सदृशाः सर्वे कुलेन सदृशाः तथा ।' जातीने व कुलाने सर्व लोक सम होते. (शांतिपर्व अ. १०७, ३०)
 गणराज्यांत समता होती, शास्त्रविहित विषमता नव्हती याचे आणखी एक प्रमाण जुन्या ग्रंथांत मिळते. मनु आणि आपस्तंब हे चातुर्वर्ण्याचे अभिमानी शास्त्रकार होते. त्यांची गणराज्यांतील लोकांवर वक्रदृष्टी होती. आपस्तंबाने गणराज्यांकडून दान घेण्यास ब्राह्मणांना मनाई केलेली आहे. आणि मनूने मल्ल लिच्छवी या गणराज्यांतील लोकांना व्रात्य (भ्रष्ट आर्य) ठरविले आहे. (डॉ. जयस्वाल- मनु आणि याज्ञवल्क्य, पृ. ४०) या शास्त्रकारांनी उपदेशिलेली विषमता त्या गणराज्यांत नव्हती, तेथे त्यांच्या मताप्रमाणे सब गोलंकार होता, याचा हा अप्रत्यक्ष पुरावा म्हणून तरी मानता येईल असे वाटते.
 वर सांगितलेच आहे की त्या काळात भारताचे सर्व वैभव साम्राज्यसत्तांनीच वाढविले होते. त्यामानाने गणराज्यांची महती थोडी, हे खरे. पण भारतात त्याकाळी व्यक्तीची प्रतिष्ठा, समता, स्वातंत्र्य या तत्त्वांचे प्रवाह, अल्पप्रमाणात का होईना, पण दीर्घकाल वहात होते, एवढे यावरून निश्चित दिसते.