पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
७१
 

स्वधर्म, स्वसंस्कृती यांचे रक्षण करू शकला, हे या लेखाचे विचारसूत्र वर अनेकवेळा सांगितलेच आहे. त्यातील समतेच्या, संघटनेच्या प्रवाहातील एक अनुकूल धारा या दृष्टीने गणराज्यांचा विचार येथे करावयाचा आहे.
 डॉ. जयस्वाल यांच्या मते इ. स. पूर्व १००० ते इ. स. ५५० हा गणराज्यांचा कालखंड होय. याच कालात नंद, मौर्य, शुंग, सातवाहन, कुशाण, गुप्त इ. घराण्यांची साम्राज्ये भारतात होऊन गेली. आणि या कालखंडात भारताचे खरे वैभव साम्राज्यातच दिसत होते. पण याच काळात उत्तर भारतात जी गणराज्ये नांदत होती त्यांचा इतिहास भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने अगदी उपेक्षणीय आहे असे नाही.
 मागील लेखात भारतीयांच्या राष्ट्रनिष्ठेचे ग्रीक ग्रंथकारांच्या आधाराने वर्णन केले आहे. त्याच आरियन, कर्टिस, डियोडोरस, प्लुटार्क, या ग्रंथकारांच्या आधाराने आपल्या 'हिंदु पॉलिटी' या ग्रंथात, डॉ. जयस्वाल यांनी भारतातील प्राजकांचे वर्णन केले आहे. त्यातील समता, स्वातंत्र्य, नागरिकांची प्रतिष्ठा या दृष्टीने अवश्य तेवढेच उतारे पुढे देतो. (पृष्ठांक हिंदूपॉलिटी या ग्रंथातले आहेत.) डियोडोरस म्हणतो, 'सौभूती गणराज्यात अतिशय हितावह असे कायद्याचे राज्य आहे. आणि त्यातील शासनपद्धती प्रशंसनीय अशीच आहे. भारतातील इतर प्रदेशांपेक्षा येथे नागरिकांना प्रतिष्ठा जास्त आहे. सौभूती आणि कठ राज्यात स्त्रीपुरुष आपापले विवाह स्वतःच ठरवितात. त्यात हुंड्याचा वा श्रेष्ठकनिष्ठ कुलाचा प्रश्न येत नाही. रूपाला मात्र फार महत्त्व असते. व्यासनदीजवळील गणराज्यातील लोक कृषिप्रिय, व शूर असून तेथे महाजनसत्ता (ॲरिस्टॉक्रसी) होती. हे महाजन न्यायाने व संयमाने सत्ता चालवीत. (अरियन) क्षुद्रक व मालव गण यांचा पराभव शिकंदराने केला असे ग्रीक लेखक म्हणतात. पण जयस्वालांच्या मते हे खरे नाही. कारण पुढील काळातील पतंजलीने, या दोन गणराज्यांनी केलेले संयुक्त प्राजक अस्तित्वात होते, असे सांगून त्यांतील क्षुद्रकांचा विजय झाला, असे म्हटले आहे. आणि शिकंदरांशी वाटाघाटी करण्यास त्यांचे जे १०० प्रतिनिधी आले होते त्यांच्या वर्णनावरून, ते जित लोक होते, असे दिसत नाही. शिकंदराने इतर कोणाचे केले नाही असे त्यांचे स्वागत केले. प्रत्येकास त्याने बसावयास सुवर्णासन दिले होते व शामियान्यात जरीचे व मखमलीचे पडदे सोडले होते. आपल्या स्वातंत्र्याचा या प्रतिनिधींना अभिमान वाटत होता आणि, 'आम्ही