पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

तर या व्यवस्थेतील क्रूर अशा विषमतेची परिसीमा होय; म्हणूनच हिंदु- समाजातील विघटनेच्या विषबीजांचा विचार करताना हिंदूंनी शिरोधार्य मानलेल्या समाजरचनेच्या या तत्त्वांचा आपण तपशिलाने विचार करीत आहोत. त्यात असे दिसून येत आहे की प्राचीन काळी धार्मिक, सामाजिक, राजकीय सर्वच क्षेत्रांत जास्तीत जास्त समता स्थापिण्याचे प्राचीन समाजधुरीणांनी पराकाष्ठेचे प्रयत्न केले होते. उत्तर काळात, साधारणतः इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या सुमारास समतेच्या या तत्त्वांचा पराभव झाला आणि त्यानंतर एक- दोन शतकांतच हिंदू समाजाचाही पराभव झाला हे दारुण सत्य आजच्या हिंदूंना प्रतीत व्हावे यासाठीच, समता व उत्कर्ष आणि विषमता व विनाश यांमध्ये निश्चित कार्यकारणभाव आहे, हे ऐतिहासिक प्रमाणांनी सिद्ध करण्याचा या लेखात प्रयत्न केलेला आहे. भारताचा इ. स. १००० पर्यंतचा इतिहास अत्यंत वैभवाचा, उत्कर्षांचा, समृद्धीचा, व पूर्णस्वातंत्र्याचा होता हे आतापर्यंत अनेक वेळा दाखविलेच आहे. तोच काळ समतेचा, एकरूपतेचा, सहकार्याचा व संघटनेचा होता हे या लेखात आपण पहात आहोत. त्यासंबंधीचाच आणखी एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा आता द्यावयाचा आहे. तो म्हणजे भारतातील गणराज्यांचा किंवा लोकशाहीचा इतिहास हा होय.
 भारतामध्ये प्राचीन काळी फार मोठ्या प्रमाणात गणराज्ये किंवा प्राजके (रिपब्लिकस्) स्थापन झाली होती व त्यांचा कारभार दीर्घकालपर्यंत यशस्वीपणे चालला होता याविषयी आता दुमत राहिलेले नाही. डॉ. काशीप्रसाद जयस्वाल यांची 'हिंदू पॉलिटी' हा ग्रंथ या विषयात बव्हंशी प्रमाण मानला जातो. काही तपशिलात त्यांच्या प्रतिपादनाविषयी अनेकांनी मतभेद व्यक्त केले आहेत. पण गणराज्यांच्या स्वरूपाविषयीची त्यांनी काढलेली सामान्य रूपरेखा बहुमान्य झाली आहे. येथे आपल्याला तपशिलात शिरण्याचे कारण नाही. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, न्यायदानातील पक्षपात यामुळे जी विषमता समाजात रूढावत होती तिला गणराज्यांमुळे कसा पायबंद बसला होता व हिंदुसमाजात काही प्रदेशांत तरी बऱ्याच अंशी समता कशी नांदत होती येवढेच आपणांस पहावयाचे आहे. अगदी प्रारंभीच्या काळापासून समता व विषमता- संघटना व विघटना- यांचे प्रवाह चालू होते. पण इ. स. १००० पर्यंत समतेच्या प्रवाहाचा जोर बराच असल्यामुळे हिंदुसमाज संघटित राहू शकला व स्वातंत्र्य, साम्राज्य,