पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
६९
 

विशेष आहे. कालाच्या ओघामध्ये विचारांना चालना न मिळाल्यामुळे या नमस्कारार्ह जाती पुढे हीन व कायमच्या बहिष्कृत झाल्या. क्षुद्र विषमता शेवटी कोणत्या थरास जाऊन पोचते व ती समाजाला कशी बाधक होते, हे पहावयाचे असल्यास हिंदुसमाजातील ही स्पर्शास्पर्शाची चाल पहावी.' (स्पर्शास्पर्श- पृ. १०७, १०८.)
 'शूद्रांमधील अस्पृश्यत्व' या प्रकारणात पं. सातवळेकरांनी प्राचीन काळातील समतेचा व सध्याच्या विषमतेचा अनेक प्रकारे ऊहापोह केला आहे. त्यांतच मनुस्मृती, कूर्मपुराण, यमस्मृती, पराशरस्मृती, बृहत्पराशरस्मृती, यांतील अनेक आधार देऊन अन्नपाण्याच्या स्पर्शास्पर्शासंबंधी सध्या ज्या अतिरेकी कल्पना रूढ झाल्या आहेत त्या मागच्या काळात मुळीच नव्हत्या, असे दाखवून दिले आहे. गोपाल, दास, नापित, कुंभार इ. अनेक शुद्र गणलेल्या जातींच्या हातचे अन्न खाण्यास, पाणी घेण्यास वरील शास्त्रकरांची मुळीच हरकत नाही. अनेक स्मृतिकारांनी सरसकट शुद्र असा शब्द वापरून ते भोज्यान्न आहेत असे मत दिले आहे. कोणी काही अल्पस्वल्प अशी बंधने घातली आहेत. पण उलट आपत्काळी कोणाच्याही हातचे अन्न खाण्यास हरकत नाही, असेही काही स्मृतिकारांनी सांगितले आहे. एवढी एक गोष्ट जरी वरिष्ठ हिंदूंनी ध्यानात ठेवली असती तरी हिंदुसमाज आजच्यासारखा शतधा दुभंगला नसता; सर्व वर्णांचे व जातींचे लोक एकमेकांत मिसळत राहिले असते आणि सहवासाने त्यांच्यातील सामरस्य दृढ होऊन त्यांचे सामर्थ्य वर्धिष्णु होत राहिले असते.
 शूद्रांना ब्रह्मचर्य, संन्यास या आश्रमांचा व गायत्रीमंत्राचाही अधिकार पूर्वी होता, हेही पंडित सातवळेकरांनी याच प्रकरणात, अनेक स्मृतिवचने देऊन, सिद्ध केले आहे. अन्नपाण्याच्या स्पर्शास्पर्शाविषयीच्या त्यांच्या मताला म. म काणे (धर्मशास्त्राचा इतिहास- खंड २ रा, भाग १ ला, पृ. १६१-६२), कुलगुरु चिं. वि. वैद्य (मध्ययुगीन भारत, भाग २ रा, पृ. ३२९-३०) यांनी पुष्टी दिली आहे.

गणराज्यांतील समता :
 समता हे समाजाच्या उत्कर्षाला, दृढतेला, संघटित वृत्तीला अत्यंत पोषक असे तत्त्व आहे. आणि चातुर्वर्ण्य म्हणजे मूर्तिमंत विषमता. अस्पृश्यता ही