पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

 शुद्रांना मंत्रिपदापर्यंत प्रवेश असल्यामुळे, 'द्विजसेवा हाच त्यांचा धर्म,' या शास्त्राचा किती मुलाहिजा राखला जात असेल याची कल्पना सहज येईल. आणि शूद्राला राजपदही दुष्प्राप्य नव्हते हे पाहिल्यावर तर त्याविषयी शंकाच राहाणार नाही. 'शुद्र राजा होऊ शकेल की नाही?' या युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्म म्हणतात, 'राजा, अपार व नौकाशून्य अशा संकटरूपी समुद्रामध्ये जो मूर्तिमंत नौकाच झालेला असतो तो जरी शुद्र असला तरी, त्याचा तो सन्मान करणे सर्वथैव योग्यच आहे.' (शांति. ७८- ३८). भीष्मांनी सांगितलेले हे मत केवळ ग्रांथिक नाही. पुराणांच्या मताअन्वये भारतवर्षांत पहिले विशाल साम्राज्य स्थापन करणार चंद्रगुप्त मौर्य हा शूद्र होता. त्याचा पुत्र बिंदुसार व नातू सम्राट अशोक हे अर्थातच शूद्र होते. दक्षिणेतील पैठणच्या सातवाहनांचे घराणे, पुराणांच्या मते, शुद्रच होते. यांचे साम्राज्य तर साडेचारशे वर्षे चालू होते. यावरून असे दिसते की, शास्त्र काहीही सांगत असले तरी प्रत्यक्षात लोकांना यात काही विपरीत वाटत नव्हते. त्यांचा या सम्राट घराण्यांना पूर्ण पाठिंबा होता.
 शक, यवन, दरद, पल्हव, निषाद, किरात, कांबोज, शबर, पुलिंद, या जमाती भारतातील आदिवासी जमाती होत असे आजचे इतिहासवेत्ते म्हणतात. शक, यवन, दरद, पल्हव हे मूळचे क्षत्रिय पण संस्कारलोपामुळे व ब्राह्मणांच्या अदर्शनाने शुद्र झालेले लोक असे मनूने म्हटले आहे. पण इतर अनेक शास्त्रकारांनी यांना संकरज म्हणून शूद्र ठरविले आहे. महाभारतात यांना नरकगामी चांडाळतुल्य लोक असे म्हटले आहे. पण महाभारतातच अनेक ठिकाणी, या लढाऊ जमाती असून जरासंध, भगदत्त, दुर्योधन यांच्या सैन्यांत ते शौर्याने लढले, असे त्यांचे वर्णन केले आहे. केवळ जन्मावरून काही जमातींवर शिक्के मारून ठेवणे व त्यांना श्रेष्ठ व्यवसाय करण्यास बंदी करणे किती अशास्त्रीय आहे हे यावरून दिसून येईल. नवव्या-दहाव्या शतकानंतर असली बंधने फारच कडक झाली व त्यांमुळेच हिंदुसमाजाचा नाश झाला.
 'नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो' इ. यजुर्वेदातील (अ. १६ । २७) मंत्र देऊन पंडित सातवळेकर म्हणतात, 'सुतार, लोहार, रथकार, कुंभार, निषाद, भिल्ल, हे सर्व कारागीर शूद्र. यांना नमन करावे असे वेदांमध्ये सांगितलेले आहे. हे मंत्र द्विजांच्या तोंडचे आहेत. त्या दृष्टीने त्यांची महती