पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

कर्ता नागजातीय इरावतपुत्र जरत्कर्ण हा होता. पहिल्या लेखात सांगितलेच आहे की आर्य हा वंशवाचक शब्द नव्हता. यज्ञनिष्ठा, वेदसंस्कृती, संस्कृत वाणी ही आर्यत्वाची लक्षणे होती. त्यांचा स्वीकार करणारे कोणत्याही वंशातले असले तरी ते आर्यच ठरत, हे या सूक्तकार नागांच्या उदाहरणांवरून स्पष्ट होते. दम हा सूर्यवंशातला विख्यात राजा. त्याने आपल्या पित्याच्या श्राद्धासाठी राक्षसकुलातील ब्राह्मण बोलाविले होते. आणि सूर्यवंशातील राजे हा आचार नेहमीच पाळीत असत (वायुपुराण). (आचार्य सेन– संस्कृतिसंगम, पृ. २६, ३४). या उदाहरणांवरून तो सिद्धान्त जास्तच दृढ होतो. नागकुलांतील ऋषी सूक्ते रचीत. राक्षसकुलांतील ब्राह्मण श्राद्धाला योग्य ठरत.

ब्रह्मवेत्ते क्षत्रिय :
 क्षत्रिय जसे मंत्रद्रष्टे होते तसेच ते औपनिषदिक ब्रह्मविद्येचे ज्ञाते व उपदेष्टेही होते. अनेक ब्राह्मणांनी क्षत्रिय राजांकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतल्याच्या कथा उपनिषदांत आहेत. गार्ग्यनामक ब्राह्मणास काशीचा राजा अजातशत्रु याने ब्रह्मविद्या शिकविली. (बृहदारण्यक, २-१०-१). जीवलपुत्र प्रवाहण या राजाने गौतमनामक ब्राह्मणाला ब्रह्मज्ञान सांगितले. (बृहदारण्यक, ६-२-१) याच प्रवाहणाकडून शलावतपुत्र शिलक व दाल्भ्य गोत्री चैकितायन हे ब्राह्मण ब्रह्मविद्या शिकले (छांदोग्य, १–८–१). केकयपुत्र अश्वपती राजाकडे प्राचीनशाल, सत्ययज्ञ इ. पाच ब्राह्मण शिष्य म्हणून आले व त्याच्यापासून त्यांनी ब्रह्मज्ञान हस्तगत केले (छांदोग्य, ५-११). जनक राजा ब्रह्मवेत्ता होता हे प्रसिद्धच आहे. तेव्हा वेदमंत्रांचे दर्शन व ब्रह्माचे ज्ञान हे ब्राह्मणांनाच होत असे असे नाही. क्षत्रियही त्या क्षेत्रात तितकेच श्रेष्ठ होते. यज्ञांत पौरोहित्य करण्याचा म्हणजे याजनाचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे अशी आज समजूत आहे. तीही चुकीची आहे. क्षत्रिय देवापीने याजन केल्याचे उदाहरण वर दिलेच आहे. ऐतरेय ब्राह्मणातील श्यार्पण्य शायकायनाचे उदाहरण असेच आहे. ब्रह्मविद्या प्राप्त करून घेण्याचा अधिकार तर त्याकाळी सर्वांनाच- शुद्रांनासुद्धा होता, हे यजुर्वेदातील 'ही कल्याणकारक वाणी मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व चारण या सर्वांसाठी उच्चारली,' या मंत्रावरून स्पष्ट होते. 'ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, व शूद्र या सर्वामध्ये तू तेज निहित कर' या तैत्तिरीय संहितेतील मंत्रावरून हेच