पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
६५
 

हर्षचरितात हे सांगितले आहे. सम्राट हर्षवर्धन (वैश्य) याने आपली कन्या वलभीचा क्षत्रिय राजा ध्रुव भट याला दिली होती. त्याची बहीण राज्यश्री ही कनोजचा गृहवर्मा याची पट्टराणी होती. वर उल्लेखिलेला भर्तृपट्ट अल्लट याने हूण राजकन्या हरियादेवी हिचे पाणिग्रहण केले होते. कलचूरी घराण्यातील यशकर्ण हा, कर्णदेव व हूण राजकन्या अव्वलदेवी, यांचा पुत्र होता. (काणे- धर्मशास्त्राचा इतिहास, खंड २ रा, भाग १ ला- पृ. ४४७ ते ४५१. शिवाय पहा— बाँबे लॉ-रिपोर्टर १९३६ ऑगस्ट १५. म. म. काणे यांचा लेख- 'भारतवर्षांतील मिश्रविवाह' स्मृती व शिलालेख यांच्या आधारे. कुलगुरु चिं. वि. वैद्य. मध्ययुगीन भारत, भाग १ ला, पृष्ठ ७८) अशा रीतीने आंतरजातीय विवाह इ. सनाच्या ९ व्या १० व्या शतकापर्यंत चालू होते. नंतर ते बंद झाले असे म. म. काणे व कुलगुरू वैद्य या दोघांनीही आपले मत दिले आहे. 'दि हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल' या मालेतील 'दी क्लासिकल एज' या खण्डाच्या प्रस्तावनेत डॉ. कन्हय्यालाल मुनशी यांनी म्हटले आहे की, 'या कालखंडात (इ. स. ३२० ते इ. स. ७४०) अनुलोम विवाह ही गोष्ट नित्याचीच होती व प्रतिलोम विवाहही अगदी दुर्मिळ होते असे नाही.' याच खण्डातील 'सोशल कंडिशनस्' या प्रकरणात डॉ. यू. एन्. घोषल यांनी या मुनशींच्या मताला साधार, सप्रमाण पुष्टी दिली आहे.

व्यवसायसंकर :
 विवाहाप्रमाणेच व्यवसायबंधनेही मागल्याकाळी स्मृतींतल्याप्रमाणे कडक नव्हती. म. म. काणे यांनी म्हटल्याप्रमाणे त्या प्राचीनकाळी हिंदुसमाजात वर्णभेद नसून वर्गभेद होता हेच खरे. वेदातील अनेक सूक्ते क्षत्रियांनी रचलेली आहेत. ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पहिले दहा मंत्र मधुच्छंद याने रचलेले आहेत. स्वतः विश्वामित्राची सूक्ते ऋग्वेदात आहेतच. गायत्री मंत्राचा द्रष्टा तोच होता हे पूर्वी सांगितलेच आहे. चंद्रवंशीय राजा पुरूरवा हाही अनेक मंत्रांचा द्रष्टा होता. शंतनूचा भाऊ देवापी हा तर मंत्रकर्ता असून तो पौरोहित्यही करीत असे. (आचार्य सेन, पृ. ३२) ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ९४ वे सूक्त नागवंशीय कद्रूचा पुत्र अर्बुद याने रचले आहे. तैत्तिरीय संहितेत म्हटल्याप्रमाणे त्याच मंडलातील १८९ व्या सूक्ताची ऋषी सर्पराज्ञी ही होती. ७६ व्या सूक्ताचा