पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

राजा, ज्याचे वर्णन धैर्यशील यज्ञशील जितेंद्रिय, सूर्यासारखा तेजस्वी, पृथ्वीसारखा क्षमाशील, बृहस्पतीसारखा बुद्धिमान असे केले आहे, ज्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले होते, ज्याच्या यज्ञांत स्वतः बृहस्पतीने याजन केले होते, (महाभारत- आश्वमेधिक पर्व अ. ४) ज्याच्या सभेत विश्वेदेव सभासद होते, तो मरुत्त राजा आयोगव होता. (डॉ. देवदत्त भांडारकर, इंडियन कल्चर,- ऑक्टो. १९३४; पृ. २७७.) महाभारत रचयिता लोमहर्षण हा सूत म्हणजेच असाच शूद्र होता हे मागे सांगितलेच आहे.
 म. म. पां. वा. काणे यांनी आपल्या ग्रंथात आंतरजातीय विवाहांची माहिती दिली आहे तीवरून हेच दिसते. बौधायन, आपस्तंब, गौतम इ. धर्मसूत्रकार व मनु, याज्ञवल्क्य इ. स्मृतिकार यांची ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्यातील अनुलोम विवाहाला पूर्ण संमती होती. काहींनी या द्विजांनी शूद्र स्त्रीशी विवाह करण्यासही संमती दिलेली आहे. पण इतरांनी या विवाहाचा कडक निषेध केला आहे. आणि ज्यांनी संमती दिली आहे त्यांनीसुद्धा खळखळ करूनच दिली आहे. पण यावरून त्रैवर्णिकांत मिश्रविवाह होत होते यात कसलीच शंका नाही. हे सांगून काणे यांनी तशा विवाहांची ऐतिहासिक काळातली उदाहरणे दिली आहेत. गुप्तवंशातील चंद्रगुप्त २ रा (वैश्य) याची राजकन्या वाकाटक नृपती रुद्रसेन २ रा (ब्राह्मण) याची पट्टराणी होती. कदंबराजा ककुस्थवर्मा (ब्राह्मण) याने आपल्या कन्यांचे विवाह गुप्त (वैश्य) व इतर अनेक क्षत्रिय घराण्यांतील राजपुत्रांशी लावून दिले होते. हे प्रतिलोम विवाह होते. वाकाटक नृपती देवसेन याचा मंत्री हस्तिंभोज याच्या एका ब्राह्मण पूर्वजाने ब्राह्मण व क्षत्रिय स्त्रिया केल्या होत्या. प्रसिद्ध संस्कृत कवी राजशेखर याची स्त्री अवन्तीसुंदरी ही चव्हाण कुलातील क्षत्रियकन्या होती. विजयनगरचा राजा बुक्क १ ला याने आपली कन्या विरूपादेवी वोडेय या ब्राह्मणाला दिलेली होती. प्रतिहार राजकुलाचा संस्थापक हरिश्चंद्र हा ब्राह्मण असून त्याची स्त्री क्षत्रिय होती. गुहिल कुळाचा संस्थापक गुहदत्त हा ब्राह्मण होता. त्याचा एक वंशज भर्तृपट्ट याने एका राष्ट्रकूट राजकन्येशी लग्न केले होते. सेनापती पुष्यमित्र शुंग याचा पुत्र अग्निमित्र याने मालविका या क्षत्रिय राजकन्येकशी विवाह केला होता. 'कादंबरी'चा लेखक प्रसिद्ध कवी बाण यांची सावत्र आई शूद्र होती. तिचे दोन मुलगे चंद्रसेन व मातृसेन हे बाणाचे भाऊ होते. स्वतः बाणानेच आपल्या