पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
६३
 

गुणकर्मांवर अवलंबून असल्यामुळे आंतरवर्णीय विवाहांवर त्या काळी कसलेच बंधन नव्हते हे उघड आहे. कोणत्याही कुळात कोणत्याही वर्णाचा पुरुष वा स्त्री निर्माण होत असे याचा हाच अर्थ आहे. पण या संबंधात तर्क करीत बसण्याचे कारण नाही. महाभारतात तसे स्पष्ट सांगितलेले आहे. वनपर्वात नहुष व युधिष्ठिर यांचा संवाद आहे. त्यांत नहुषाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना युधिष्ठिर म्हणाला, 'हे नागेन्द्रा, सध्या सर्व वर्णाचा संकर झालेला असल्यामुळे, अमक्याची अमुक जाती आहे, असे ठरविणे कठिण आहे. सर्व लोक सर्व वर्णांच्या स्त्रियांच्या ठायी अपत्ये उत्पन्न करतात. तेव्हा ब्राह्मण कोणास म्हणावे या तुझ्या प्रश्नाला, ज्याच्या ठायी वृत्त, शील, सदाचार ही आढळतील त्यालाच ब्राह्मण म्हणावे, असे मी उत्तर दिले.'
 आंतरजातीय विवाह सर्रास चालू होते याला दुसरे एक बलवत्तर प्रमाण आहे. धर्मसूत्रकार व स्मृतिकार यांनी अशा विवाहांतून निर्माण झालेल्या प्रजेच्या जाती कोणत्या याची विपुल चर्चा केली आहे. आंतरजातीय विवाहाचे म्हणजेच वर्णसंकराचे दोन प्रकार मानले जात. श्रेष्ठ वर्णाचा पुरुष व कनिष्ठ वर्णाची स्त्री यांचा विवाह तो अनुलोम व याउलट तो प्रतिलोम प्रारंभीचे सूत्रकार व स्मृतिकार यांपैकी बऱ्याच शास्त्रकारांनी अनुलोम विवाह विहित मानलेला होता. तेव्हा तो सर्रास घडत असल्यास नवल नाही. पण प्रतिलोम विवाहही विपुल होत असत. श्रीधरशास्त्री पाठक म्हणतात, 'चारही वर्णांचा परस्परसंबंध होऊ शकत असल्यामुळे केवळ अनुलोम विवाह घडून आले असे नसून मनुष्यस्वभावानुपार प्रतिलोम विवाहही घडत गेले. याज्ञवल्क्याने सूत, वैदेहिक, चांडाल, मागध, क्षत्ता, आयोगव, रथकार अशी भिन्न भिन्न वर्णांच्या संयोगाने झालेल्या प्रतिलोम संततीच्या जातींची नावे दिली आहेत. त्यांच्या मते ही सर्व असत् संतती होय. इतरही अनेक स्मृतिकारांनी अशाच याद्या दिल्या आहेत. (अस्पृध्यतेचा शास्त्रार्थ- पृ. ५६ ते ५९). प्रतिलोम संतती सर्व शूद्र मानली जात असे. अनुलोम संततीही काही शास्त्रकारांच्या मते शुद्र ठरे. आणि या वर्णांची संख्या सारखी वाढत होती हे तर स्पष्टच आहे. तेव्हा अनुलोम व प्रतिलोम असे दोन्ही मिश्र विवाह मागल्याकाळी विपुल घडत यात शंका नाही. प्रारंभी हे निषिद्ध मानलेले नव्हते. आयोगव ही जाति प्रतिलोम; म्हणून शूद्र होय. पण ऐतरेय ब्राह्मणातील प्रसिद्ध मंत्रातील आविक्षित मरुत्त हा