पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

विशिष्ट कर्मे करून शुद्र, वैश्य, क्षत्रिय यांना कोणताही वर्ण प्राप्त करून देता येतो; शुद्र ब्राह्मण होऊ शकेल, वैश्य क्षत्रिय होऊ शकेल, असे प्रतिपादिले आहे. (२२३-१४,३२). 'शूद्र आगमसंपन्न असेल तर तो संस्कृत ब्राह्मण होतो', हा महाभारतातला विचार येथेही पुन्हा आलेला आहे. आणि वर असे सांगितले आहे की 'अशा आगनसंपन्न शूद्राची ब्राह्मणानेही सेवा करावी' हे मत स्वयं ब्रह्मा सांगतो (आचार्य सेन– भारतवर्ष में जातिभेद- पृ. ४० ).

समसंधीचे तत्त्व
 शुद्र आगमसंपन्न झाला तर त्याला ब्राह्मण मानावे असे अर्थी ज्या त्या काळचे धर्मवेत्ते म्हणतात त्याअर्थी शूद्राला आगमसंपन्न होण्याची संधी तेव्हा होती हे निर्विवाद आहे. संधिसमानत्वाचे तत्त्व हे समाजाच्या उत्कर्षाला अत्यंत अवश्य असते. उत्तरकालीन धर्मशास्त्रज्ञांनी हेच नष्ट केल्यामुळे हिंदुसमाजाला अवकळा आली. प्राचीन काळी हे तत्त्व केवळ बोलण्यापुरते किंवा ग्रंथापुरते नव्हते, हे अनेक उदाहरणांवरून, विशेषतः विवाहबाह्य संततीतून जे थोर पुरुष झाले त्यांच्या चरित्रांवरून स्पष्ट दिसते. व्यास हा धीवरीचा (कोळणीचा) पुत्र, पराशर श्वपाकीचा (चांडाळीचा) आणि वसिष्ठ हा वेश्येचा पुत्र होता. ऐतरेय ब्राह्मणाचा कर्ता महीदास इतरा नामक शूद्र स्त्रीपासून झाला होता. दीर्घतमा ऋषीची माता उशिज ही शूद्र दासी होती (आचार्य सेन- भारतवर्ष में जातिभेद' पृ. १२, १४, २४). कवष ऐलूष व सत्यकाम जाबाली यांच्या कथा प्रसिद्धच आहेत. विवाहबाह्य संबंधातून उत्पन्न झालेले हे सर्व पुरुष हीन गणले गेले असते, त्यांना उत्कर्षांची संधी मिळाली नसती तर भारतीय संस्कृती किती दरिद्री राहिली असती याचा विचार मनात आला की पुढील काळातील धर्मशास्त्रज्ञांच्या हेकटपणाचा उद्वेग येतो. पूर्वकाळच्या ऋषींची अशी कोती दृष्टी नव्हती, हे आपले भाग्यच होय. काठकसंहितेत म्हटले आहे की, 'ज्ञान व तपस्या या गुणांमुळे मनुष्य ब्राह्मण ठरतो. मग त्याच्या मातापित्यांची चौकशी कशाला करता? वेद ब्राह्मणाचा पिता व तोच त्याचा पितामह होय' (कित्ता पृ. ४१)

वर्णसंकर
 ब्राह्मण्य, क्षत्रियत्व, वैश्यत्व व शूद्रत्व- म्हणजेच मनुष्याचा वर्ण असा त्याच्या