पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
६१
 

यामुळेच गुणांवरून मनुष्याचा वर्ण ठरतो, जन्मावरून नव्हे. ही विचारधारा त्या काळी प्रबल होती असे दिसते. महाभारतामध्ये आदि, वन, अनुशासन, शांति या पर्वात हा विचार पुनः पुन्हा आवर्जून सांगितलेला आहे. मनुष्य ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कशामुळे होतो? असे भारद्वाजाने भृगूला विचारले. त्या वेळी भृगू म्हणाला, "वेदाध्ययन, सदाचार, सत्यपरायणता या गुणांनी ब्राह्मणत्व येते. प्रजापालन, क्षात्रतेज इ. गुणांनी मनुष्य क्षत्रिय होतो. कृषिगोरक्ष्य, धनार्जन यामुळे मनुष्य वैश्य होतो. आणि जो वेदांचा त्याग करतो, नित्य अमंगळ असतो, ज्याला भक्ष्याभक्ष्यविचार नाही, तो शूद्र होतो." गुणांची अशी परीक्षा होण्यासाठी सर्वांना समसंधी मिळणे अवश्य आहे. नाही तर कोणाची प्रवृत्ती कशी, हे कळण्यास मार्गच राहणार नाही. म्हणून या सर्व वर्णांना- म्हणजेच सर्व समाजाला- यज्ञाचा व वेदाचा अधिकार आहे, असे भृगूने स्पष्टपणे सांगितले आहे. आणि शेवटी 'सत्य, तप, विद्या ही लक्षणे शूद्राच्या ठायी असतील तर तो शूद्र ब्राह्मण होय, आणि ब्राह्मणाच्या ठायी नसतील तर तो ब्राह्मण शूद्र होय असा निर्वाळा दिला आहे.' (शांतिपर्व) पितामह भीष्मांनी तर, 'जो ब्राह्मण वरील सात्त्विक गुणांनी संपन्न नसेल त्याला दास मानून वेठीला धरावे व दासाचे भोजन त्याला द्यावे', असे आपले मत दिले आहे. अनुशासनपर्वात शंकर पार्वतीला सांगतात की 'हीन कुलात जन्मलेला शूद्र जर आगनसंपन्न असेल तर त्याला संस्कृत ब्राह्मण मानावे.'
 तांड्यब्राह्मणात पुढील कथा आहे. कण्व या ब्राह्मणकुळात वत्स व मेधातिथी असे दोन पुत्र- भाऊ- होते. त्यांतील वत्साची आई शुद्र होती. तेव्हा मेधातिथी त्याला म्हणाला की, 'तू यामुळे ब्राह्मण नाहीस. शूद्र आहेस.' तेव्हा वत्साने एकदम अग्निदिव्य केले. अम्मीने त्याला दग्ध केले नाहीच. उलट तो मेधातिथीपेक्षा श्रेष्ठ ब्राह्मण (ब्रह्मीयान्) ठरला. हीन- कुळजन्म हा स्त्रियांनाही त्याकाळी बाधक ठरत नसे. 'स्त्रीरत्नं दुष्कुलाद् अपि' हे मनुवचन प्रसिद्ध आहे. तसे सांगून मनूने अक्षमाला व शारंगी यांची उदाहरणे दिली आहेत (मनु. ९.२३ व २४). या दोघी अधमयोनिजा होत्या. पण वसिष्ठ व मंदपाल या ऋषींनी त्यांचे पाणिग्रहण केले व त्या भारतीयांना पूज्य ठरल्या. अक्षमाला हीच अरुंधती होय. विवाहसमयी आजही वधूवरांनी तिला वंदन करावयाचे असते. (श्रीधरशास्त्री पाठक- अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ, पृ. ५६) ब्रह्मपुराणातही ती ती