पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

ते जन्मनिष्ठ नव्हते व त्यासंबंधीची बंधने उत्तरकाळातल्याप्रमाणे कडक तर मुळीच नव्हती याबद्दल फारसा वाद नाही. म. म. काणे यांच्या मते त्या प्रारंभीच्या काळी वर्ण नसून वर्ग होते. त्यांचे हे म्हणणे प्रमाणसिद्ध आहे हे पुढील उदाहरणांवरून कळून येईल. त्या काळी क्षत्रिय कुळांत अनेक ब्रह्मर्षी निर्माण होत व ब्राह्मण कुळांत अनेक राजपुरुष उत्पन्न होत. वीतहव्य हा राजा क्षत्रिय होता. भृगुऋषींच्या कृपेने तो ब्रह्मर्षी झाला. त्याचा पुत्र गृत्समद हा वेदांतल्या काही सूक्तांचा कर्ता आहे. सुतेजा, प्रमती हे त्याच्याच कुळातले ब्राह्मण होत. शौनक हा प्रसिद्ध ऋषी त्याच्याच कुळातला होय. या शौनकाने चातुर्वर्ण्य निर्माण केले असे विष्णुपुराण म्हणते. म्हणजे त्याच्या आधी ते नव्हते एवढे निश्चित करते. शौनकाचा पिता शुनक याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या सर्व वर्णांचे पुत्र होते, असे हरिवंशपुराण म्हणते. नहुष हा क्षत्रिय राजा. त्याचा पुत्र यति हा योगबलाने ब्रह्मर्षी झाला. बळीराजाचे अंग, वंग, कलिंग इ. पाच पुत्र क्षत्रिय होते. त्यांची संतती बालेय ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध आहे (हरिवंश). भगवान ऋषभदेव यांना शंभर पुत्र होते. त्यांतील ज्येष्ठ पुत्र भारताचा अधिपती (क्षत्रिय) झाला. त्याच्याहून कनिष्ठ ८१ पुत्र महाश्रोत्रीय (ब्राह्मण) झाले (भागवत- पुराण). पुरुवंशात कोणी क्षत्रिय झाले, कोणी ब्राह्मण झाले. मुद्गल राजाच्या कुळातील संतती मौद्गल्य ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध आहे. विश्वामित्र तपोबलाने क्षत्रियाचा ब्राह्मण झाला हे प्रसिद्धच आहे. पण एवढेच नाही. तो ब्राह्मणांचा गोत्रकर्ताही झाला. त्याचे अनेक पुत्र तपस्वी व ब्रह्मवंशविवर्धन झाले. सुप्रसिद्ध गायत्रीमंत्राचा कर्ता विश्वामित्रच होय. मांधाता, पुरुकुत्स, अजमीढ, कक्षीव, विष्णुवृद्ध हे सर्व ब्रह्मर्षी क्षत्रियकुलोत्पन्न होते (वायुपुराण) नाभाग व वृष्टि या क्षत्रियांचे पुत्र वैश्य झाले. ('भारतवर्ष में जातिभेद'- क्षिति मोहन सेन पृ. २६ ते ४०. चिं. वि. वैद्य; 'मध्ययुगीन भारत'- भाग २, पृ. ६९-७२)
 वरील इतिहास ध्यानात घेऊनच 'प्रारंभी एकच वर्ण होता व त्यातून गुणकर्मभेदाने पुढे चार वर्ण निर्माण झाले, असे रामायण, महाभारत, भागवत, ब्रहापुराण, लिंगपुराण इत्यादी प्राचीन ग्रंथांत वारंवार सांगितलेले आढळते. (श्रीधरशास्त्री पाठक- 'अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ' पृ. ३०; पंडित सातवळेकर- 'स्पर्शस्पर्श' पृ. १३; आचार्य सेन- 'भारतवर्ष में जातिभेद' पृ. ९.)