पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
५९
 

म्हणतात, 'समाजामध्ये उच्चनीच भेद कल्पिणे व ते जन्मसिद्ध असून कोणत्याही कारणाने नष्ट होऊ शकत नाहीत असे मानणे, हे वैदिक धर्माच्या अगदी विरुद्ध आहे या शंका नाही.'
 सुदैवाने वेदांच्या उत्तरकाळीही (इ. स. पू. १००० ते इ. स. १०००) दीर्घकाळपर्यंत या संघटनापोषक धर्माचा विजयच होत गेला. त्यामुळेच हिंदुसमाज संघटित व समर्थ होऊ शकला. पण हळूहळू विघटनेच्या, विषमतेच्या विचारप्रवाहाचा जोर वाढत जाऊन शेवटी त्याने पहिल्या विचारप्रवाहावर मात केली आणि त्याच्या पुरस्कर्त्या धर्मशास्त्रज्ञांनी हिंदुसमाज धुळीस मिळविला.
 या दोन प्रवाहांच्या संघटनविघटनकार्याचा इतिहास आता पहावयाचा आहे. वेदकाळी व नंतरही दीड-दोन हजार वर्षे वर सांगितलेली समतेची तत्वे केवळ ग्रंथापुरती सांगितलेली नसून प्रत्यक्षात अवतरलेली होती हे सिद्ध करण्यास आता विपुल प्रमाणे उपलब्ध झालेली आहेत. त्यांच्या आधारे इ. स. १००० पर्यंतच्या हिंदुसमाजाचे स्वरूप या लेखात प्रथम पाहू. आणि नंतर याच काळात सुप्त असलेली भेदभावाची, विषमतेची, विघटनेची बीजे विकसित होऊन त्यांचा घातक परिणाम कसा झाला त्याचा पुढील लेखात विचार करू.
 [यानंतरचे विवेचन पुढील ग्रंथकारांच्या आधारे केलेले आहे. म. म. पांडुरंग वामन काणे- 'धर्मशास्त्राचा इतिहास:' म. म. श्रीधरशास्त्री पाठक- 'अस्पृश्यतेचा शास्त्रार्थः' पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर- 'स्पर्शास्पर्श;' आचार्य क्षितिमोहन सेन- (१) 'भारतवर्ष में जातिभेद', (२) 'संस्कृति -संगम' : डॉ. काशीप्रसाद जयस्वाल- (१) 'मनु आणि याज्ञवल्क्य'; (२) 'हिंदू पॉलिटी': कुलगुरु चिं. वि वैद्य- 'मध्ययुगीन भारत,' भाग १, २, ३. या थोर पंडितांनी मूळ ग्रंथांतली शेकडो अवतरणे दिली आहेत. या लेखांत मी त्यांच्या ग्रंथांतले पृष्ठांक दिलेले आहेत. त्यांनी उद्धृत केलेल्या वचनांचा मूळ पत्ता दरवेळी विस्तारभयास्तव दिलेला नाही. तो जिज्ञासूंनी मुळातून पहावा.]

गुणनिष्ठ वर्ण :
 वेदकाळी चातुर्वर्ण्यव्यवस्था होती किंवा नाही याविषयी पंडितांमध्ये मतभेद आहेत. पण तो प्रश्न वादग्रस्त म्हणून सोडला तरी त्याकाळी वर्णभेद असलेच तर