पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

 "जो अग्नि विश्वाचा ध्वज आहे, भुवनाचा गर्भ आहे, जो द्युलोक व पृथ्वी यांना व्यापून आहे, जो मेघ व पर्वत यांना भेदून टाकतो, त्या अग्नीचे (वा परमेश्वराचे) पाचही प्रकारचे लोक यजन करतात.'

यज्ञियासः पंचजना मम होत्रं जुषध्वम् ।
पंचजना मम होत्रं जुषन्ताम् । ऋ. १०।५३

 'यजन करणारे पंचजन माझ्या होत्राचे- यज्ञाचे- सेवन करोत.'
 पंचजन म्हणजे सर्व समाज, सर्व जनता, मनुष्यमात्र. (श्रीमत् शंकराचार्य व श्रीसायणाचार्य यांनी असा अर्थ दिला आहे) तेव्हा सर्व- भेदनिरपेक्ष सर्वांनी यजन करावे अशी ही वेदाज्ञा आहे. 'विश' हा शब्द जनता, बहुजनसमाज याच अर्थाने मागे वापरीत. कोठे कोठे ब्राहाण व क्षत्रिय यांच्या खेरीज इतर समाज असाही अर्थ आहे. तरी 'त्वामने मानुषीरीळते विशः ।ऋ. ५।८।३॥ अग्निं होतारं ईळते यज्ञेषु मानुषो विशः ।ऋ. ६।१४।२॥ अशा ॠग्-मंत्रांतून 'विश तुझे स्तवन करतात' असा उल्लेख करून मंत्रकर्त्यांनी आपले व्यापक, उदार, समतेचे तत्त्व स्पष्ट केले आहे.
 वेदकाळी उच्चनीच, श्रेष्ठकनिष्ठ अशी भावना नव्हती. समता, बंधुता व स्वातंत्र्य, याच तत्त्वांचे मंत्रकर्ते ऋषी उपासक होते हे अनेक मंत्रांवरून दिसून येते. समतेचे मंत्र आपण पाहिले. आता बंधुतचे पाहू.

अज्येष्ठासो अकनिष्ठास एते । सं भ्रातरो वावृधुः सौभगाय

॥ ऋ. ५।६०।५॥


ते अज्येष्ठा अकनिष्ठास उद्भिदो । अमध्यमासो महसा विवावृधुः ॥

ऋ. ५।५९।६॥

'कोणी ज्येष्ठ नव्हेत, कनिष्ठ नव्हेत व मध्यनही नव्हेत, ते सर्व परस्परांचे बंधू आहेत व उत्तम भाग्यासाठी सर्व वाढत आहेत.'
 वेदकाळी समाजाची उभारणी समतेच्या व बंधुतेच्या तत्त्वांवर झाली होती, जन्मनिष्ठ उच्चनीचता ते ऋषी मानीत नसत हे या मंत्रांवरून दिसून येईल. पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी 'स्पशास्पर्श विचार' या ग्रंथात वरील वेदवचने देऊन ऋषींची ही तत्त्वे स्पष्ट केली आहेत. (वरील अवतरणे तेथूनच घेतलेली आहेत. प्रकरण ४ थे पहा.) प्रकरणाचा समारोप करताना पं. सातवळेकर