पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

वैश्यांचा १२ अक्षरांचा. तीन-चार अक्षरे जास्त झाल्यामुळे ते मंत्र पाठ करण्यास एकदोन वर्षांनी वय जास्त असणे अवश्यच आहे ! ब्राह्मणाचे उपनयन आठव्या वर्षी व्हावयाचे. क्षत्रियाच्या मंत्रात तीन अक्षरे जास्त. तेव्हा तो पाठ करण्यास त्याला तीन वर्षे जास्त लागणारच. म्हणून त्याचे उपनयन अकराव्या वर्षी, आणि ४ अक्षरे जास्त म्हणून वैश्याचे बाराव्या वर्षी !
 आचारभेद करता करता शास्त्रीपंडित कोणत्या थराला गेले ते पहा. शौचाहून आल्यावर ढुंगण किती वेळा धुवावे यातही भिन्नतत्त्व असावे असा त्यांचा कटाक्ष होता. ब्राह्मणाने आठ वेळा, क्षत्रियाने सहा वेळा, वैयाने चार वेळा व शुद्राने दोन वेळा ! यातही समानता आली तरी चातुर्वर्ण्य लोपेल अशी त्यांना भीती होती.

हिंदु- एक मानवसमूह
 ज्या मानवसमूहात इतका परस्परभेद आहे, आणि तो भेद असलाच पाहिजे असे जेथे शास्त्र आहे त्या समूहाला समाज म्हणणे कसे शक्य आहे ? वर्णावर्णामध्ये, जातीजातींमध्ये जेथे इतका दूरीभाव आहे की एका वर्णाला दुसऱ्याची सावलीही चालत नाही, त्याच्या शब्दाचे श्रवण चालत नाही, एकाच रस्त्याने दोघांनी जाणे जेथे निषिद्ध, त्या समूहाला समाज म्हणणे कसे शक्य आहे ? काही जमातींनी जन्मोजन्मी दुसऱ्यांच्या दास्यातच राहिले पाहिजे, पशुवत् जिणेच जगले पाहिजे, असे ज्यांचे धर्मशास्त्र आहे त्या मानवसमूहाला समाज म्हणणे कसे शक्य आहे ? ज्या समूहात समाजधुरीण हीनजातीय लोकांच्या सुखदुःखाची, त्यांच्या योगक्षेमाची, ते जगतात की मरतात याची अणुमात्रही चिंता वाहत नाहीत, त्या समूहाला समाज म्हणणे कसे शक्य आहे ? समूहातले भिन्न घटक- भिन्न व्यक्ती व जातीजमाती— जितके परस्परांच्या जास्त जवळ येतील, त्यांच्यात स्नेहभाव जितका जास्त निर्माण होईल, काही समबंधनांनी ते जितके जास्त बद्ध होतील तितका तो समूह जास्त संघटित होतो व त्याला 'समाज' ही पदवी प्राप्त होते. पण ज्या समूहातील धुरीण सोळे-ओळे, पावित्र्य- पातित्य, रक्तशुद्धी– रक्तसंकर इ. विचारांनी प्रत्येक घटक दुसऱ्यापासून तोडून काढण्यातच धन्यता मानतात आणि असे धर्मशास्त्र स्थापित करण्यात कृतार्थता मानतात त्या समूहाला समाज म्हणणे कसे शक्य आहे ?