पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
५५
 

दृष्टींनी जितका अधिक एकरूप असतो तितका तो जास्त संघटित व म्हणूनच बलशाली होतो. 'साम्याद् हि सख्यं भवति, वैषम्यान्नोपपद्यते। हे व्यासवचन अगदी खरे आहे. हे जाणूनच प्राचीन आर्यांनी समतेच्या तत्त्वावर हिंदु- समाजाची उभारणी करण्याचा निर्धार केला होता. पण पुढील समाजाशास्त्रवेत्त्यांना त्याचा विसर पडला; नव्हे, त्यांनी जाणूनबुजून त्याचा त्याग केला. आणि अहोरात्र विघटनेचेच प्रयत्न केले. 'विघटनेचे प्रयत्न' हे शब्द जरा चमत्कारिक लागतील. पण ते यथार्थ आहेत. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता ही त्यांची त्रयीविद्या होती. आणि तिचा पुरस्कार करताना हा हिंदुसमाज जितका भिन्नरूप होईल, विषम होईल, तितका करण्याचा त्यांनी निर्धार केला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र व अस्पृश्य आणि यांच्या संकरांतून निर्माण झालेल्या अनंत आंतरप्रभव जाती यांनी परस्परांत विवाह करू नये आणि एकमेकांचे व्यवसाय त्यांनी करू नयेत असे दण्डक तर त्यांनी घातलेच, पण एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. म्हणून या भिन्न घटकांनी परस्परांचे अन्न घेऊ नये, पाणी घेऊ नये, त्यांनी परस्परांना स्पर्शही करू नये अशी बंधने धर्म म्हणून त्यांनी लावून दिली. हिंदुधर्म हा सनातन वैदिकधर्म असे आपण म्हणतो. वेद हिंदूंना अत्यंत पूज्य आहेत असे मानले जाते. पण हिंदूंना म्हणजे कोणाला ? शूद्र व अस्पृश्य हा या मानवसमूहातील बहुसंख्य वर्ग. त्यांना वेदपठनाचा तर राहोच पण श्रवणाचासुद्धा अधिकार नव्हता. म्हणजे विद्या, पूज्यग्रंथ यांच्याही बाबतीत हा समाज भिन्नरुपच राहिला पाहिजे, असा त्या धर्मशास्त्रज्ञांचा कटाक्ष होता. क्षणभर विवाह, व्यवसाय, वेदपठन हे सोडून देऊ. सर्व वर्णांना व जातींना समआचार लावून देऊन त्यांच्यात साम्य, समबंध, समरसता निर्माण करण्याचे तरी त्या धर्मशास्त्रज्ञांनी प्रयत्न केले काय ? नाही. याही बाबतीत त्यांचे विघटनेचेच धोरण होते. कोणत्याही दोन वर्णांमध्ये एकही सम आचार नसलाच पाहिजे असे त्यांचे धोरण होते. त्रैवर्णिकांना वेदाधिकार होता. पण त्यातही ब्राह्मणाचा सावित्रीमंत्र निराळा, क्षत्रियाचा निराळा, वैश्याचा निराळा. त्यांची उपनयनाची वयोमर्यादाही निराळी ! अलीकडे चातुर्वर्ण्याचे काही शास्त्रीय समर्थन करण्याची रीत निघाली आहे. या भिन्नवयोमर्यादांचे बाळशास्त्री हरदास यांनी कसे समर्थन केले आहे पहा. ब्राह्मणांचा सावित्रीमंत्र ८ अक्षरांचा असे, क्षत्रियांचा ११ अक्षरांचा व