पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

आपण अवलंबिले होते, ज्या धर्माचा आपण आश्रय केला होता त्याचा या पुढल्या काळात आपण त्याग केला असला पाहिजे, म्हणूनच ही अवकळा आली. हेच खरे आहे. धर्म, समाजव्यवस्था, अर्थव्यवहार यांची जी मूलतत्त्वे प्राचीन काळी आपण शिरोधार्य मानली होती त्यांचे मूळ स्वरूप या वेळी अगदी लोपून त्यांना अत्यंत विकृत, अत्यंत विपरीत असे रूप इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या आगेमागे प्राप्त झाले होते. आणि या धर्मलोपामुळेच हिंदुसमाज हतप्रभ होऊन गेला होता.
 समता, सहकार्य, स्वातंत्र्य, प्रवृत्तिवाद, बुद्धिनिष्ठा या थोर तत्त्वांवर प्राचीनांची श्रद्धा होती. ती पुढे पुढे नष्ट झाली आणि विषमता, दूरीभाव, निवृत्तिवाद, शब्दप्रामाण्य यांचे उत्तरोत्तर प्राबल्य होत गेले. वेदकाळापासून इ. स. १००० वर्षांपर्यंत भारताचा इतिहास पाहता एक गोष्ट ध्यानात येते की, वरील दोन्ही परस्पर विरुद्ध विचारांचे प्रवाह भारतात प्रारंभापासून चालू होते. पण प्रारंभीच्या काळात समता, बुद्धिवाद यांनी संपन्न असलेल्या, समाजसंघटनेला पोषक अशा प्रवाहाचा जोर विशेष होता. त्यामुळेच हिंदुसमाज समाजरूप पावला व त्याचा उत्कर्ष झाला. पण हळूहळू दुसऱ्या प्रवाहाचा जोर वाढू लागला व विषमता, निवृत्तिवाद या प्रतिगामी तत्त्वज्ञानाने अखेर पहिल्या समतेच्या, संघटनेच्या धर्मावर मात केली व हिंदुसमाजाला अधःपातास नेले. 'धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।' हे वचन अगदी खरे ठरले. आपण समता, स्वातंत्र्य, बुद्धिवाद या धर्माचे रक्षण केले नाही. तो धर्म हत झाला. त्यामुळे त्यानेच आपल्याला विनाशाला नेले.
 या दोन विचारप्रवाहांच्या काठाने चालत जाऊन त्यांचे अवलोकन आपल्याला आता करावयाचे आहे. या लेखात आपण समतेच्या, संघटनेच्या धर्माचे स्वरूप पाहू आणि नंतर पुढील लेखात विषमता, विघटना या विनाशक विचारसरणींचा अभ्यास करू. पण तुलना चांगली मनात भरावी यासाठी प्रथम दोन्ही तत्त्वज्ञानांचे स्थूलमानाने आलोचन करून मग तपशिलात शिरू. 'समासेन तु वक्ष्यामि विस्तरेण च वै पुनः।' ही व्यासांची पद्धती केव्हाही श्रेयस्कर होय.

विघटनेचे प्रयत्न :
 कोणताही समाज आचार, विचार, आकांक्षा, सुखदुःखे, पूर्वपरंपरा या