पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

खंडणी जयपाळाने न दिल्यामुळे सबुक्तगीनाने पुन्हा स्वारी केली. त्या वेळीही जयपाळाचा पराभव झाला. आणि पंजाब प्रांत हिंदूंच्या हातातून कायमचा जाऊन भारताच्या आणि हिंदूंच्या इतिहासातील प्रदीर्घ तमोयुगास प्रारंभ झाला. एक दोन लढायांतील पराभवांवरून काहीच निष्कर्ष काढता येत नाही. तेव्हा जयपाळाचा दोनदा पराभव होऊन हे पराभवकांड येथेच थांबले असते तर युग पालटले, असे म्हणता आले नसते. पण सुबुक्तगीनाचा मुलगा गझनीचा महमूद याने १००१ मध्ये भारतावर स्वाऱ्या करण्यास प्रारंभ करून १०२४ पर्यंत एकंदर सतरा स्वाऱ्या केल्या. पण हिंदूंना त्याचा एकदाही पराभव करता आला नाही. पुढील तीनशे वर्षांत मुस्लीम आक्रमणे अव्याहत होत होती. बाराव्या शतकाच्या अखेर भारतात घोरीवंशाचे राज्यच स्थापन झाले. आणि पुढील शतकात बंगाल बिहार, आसाम, गुजराथ, माळवा हे सर्व प्रांत मुस्लीमांनी जिंकून घेतले. अजून दक्षिणेत मुस्लीमांचा प्रवेश झाला नव्हता. पण चौदाव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिणापथात प्रवेश करून मुस्लीमांनी पंधरा-वीस वर्षातच यादव, होयसळ, पांड्य, चोल इ. राज्ये बुडविली व अखिल भारत आक्रांत केला.
 इ. स. हजारपूर्वीचे भारताचे वैभव, त्याचे क्षात्रतेज, त्याचे शौर्यधैर्य, त्याचे स्वातंत्र्य व त्याचे दिग्विजय आणि त्यानंतरचे त्याचे दैन्य, दौर्बल्य, पारतंत्र्य, गुलामगिरी, प्रतिकारशून्यता, मानहानी स्वत्वशून्यता- अशी ही दोन चित्रे समोर आली असता इ. स. १००० च्या सुमारास कोठल्या तरी धार्मिक, सामाजिक वा राजकीय अशा दुर्धर रोगाने भारतीय समाज ग्रस्त झालेला असला पाहिजे याविषयी शंका रहात नाही. जे जीवनाचे तत्त्वज्ञान, जी धर्माची, समाजरचनेची, राजशासनाची मूलतत्त्वे पूर्वी भारताने अवलंबिली होती त्यांचा त्याने त्याग केला असला पाहिजे किंवा त्यांना अत्यंत विकृत रूप आले असले पाहिजे; त्यावाचून एवढ्या समर्थ, बलशाली समाजाचा असा दारुण अधःपात होणार नाही, हे सहज ध्यानात येते. तेव्हा आज विश्वहिंदु परिषदेसारख्या संस्था स्थापून हिंदूंच्या पुनरुज्जीवनाचा विचार करावयाचा असेल तर ज्या रोगानं या समाजाला ग्रासले आहे त्याची चिकित्सा प्रथम केली पाहिजे, आपल्या अवनतीची मीमांसा आधी केली पाहिजे, याविषयी दुमत होईल असे वाटत नाही. या तिसऱ्या व पुढील चवथ्या लेखात हीच मीमांसा करावयाची आहे.