पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
५१
 

शतकापासून येऊ लागलेल्या आरबांच्या आक्रमणांनाही त्याला यशस्वीपणे तोंड देऊन त्यांचा निःपात करता आला. इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकात स्कंदगुप्त व यशोवर्मा यांनी हूणांचा निःपात केल्यानंतर पुढील पाचशे वर्षांत भारतावर शककुशाणहूणांच्या आक्रमणाइतके भयंकर आक्रमण झाले नाही, असे काही इतिहासपंडितांचे मत आहे. पण ते तितकेसे यथार्थ वाटत नाही. आठव्या शतकाच्या प्रारंभापासून सुरू झालेली आरबांची आक्रमणे काही कमी भयानक नव्हती. या काळात आरबांनी दक्षिण युरोप जवळजवळ सर्व जिंकला होता. इजिप्त, इराण तार्तरी हे प्रदेश तर त्यांनी पहिल्या धडाक्याला लोळविले. इजिप्त, इराण,मधली प्राचीन साम्राज्ये त्यांनी धुळीस मिळविली. त्यांच्यापुढे उभे राहणे, फ्रान्समधील चार्लस मार्टलचा अपवाद वजा करता, कोणालाच शक्य झाले नाही. हिंदुस्थानात प्रथम महंमद कासीमने सिंध जिंकला तेव्हा तीच परिस्थिती निर्माण झाली होती. पण हळूहळू राजस्थानातले राजपूत आरबांशी मुकाबला करण्यास सिद्ध झाले व बाप्या रावळ, कालभोज यांनी त्या जगज्जेत्यांना चांगलाच धडा शिकविला. खलिफा अलमामून याच्या कारकीर्दीत आरबांनी राजस्थानवर चोवीस वेळा स्वाऱ्या केल्या. पण तितक्याही वेळा मेवाडचा राजा दुसरा खुम्माण याने त्यांना खडे चारले. यापूर्वी आरबांनी दक्षिणेत उतरण्याचा प्रयत्न केला होता. पण गुजराथच्या चालुक्यांनी आपल्या खड्गाचा तेथेही अडसर घातला. यामुळे आरबांचा दक्षिण भारतात शिरकाव झाला नाही आणि भारतात मुस्लीमांचे राज्य स्थापन झाले नाही. रजपूत आणि चालुक्य यांच्या या पराक्रमाला विशेष अर्थ आहे. शक, हूण यांना स्वतःचा निराळा असा धर्म नव्हता, स्वत्व नव्हते. पण मुस्लीमांचे तसे नव्हते. अत्यंत कडव्या व आक्रमक अशा धर्माचे ते उपासक होते. शिवाय आरबांची संस्कृती ही उच्च दर्जाची होती. पण त्यांनाही भारतीयांनी रणात पराभूत केले. त्यामुळे भारताचे स्वातंत्र्य टिकवून स्वधर्म व स्वसंस्कृती यांचे संरक्षण करण्यास हिंदू अजूनही समर्थ होते. हे सिद्ध झाले.

चित्र पालटू लागले

 दहाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आणि विशेषतः अकराव्या शतकाच्या प्रारंभापासून- इ. स. १००१ पासून- मात्र हे चित्र पालटू लागले. इ. स. ९८० मध्येच जयपाळाचा पराभव करून सुबुक्तगीनाने पंजाब घेतला. पुढे ठरलेली