पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

केला त्याचा इतिहास देताना, भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणारे चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, पुष्यमित्र, समुद्रगुप्त, स्कंदगुप्त, यशोधर्मा हे राजे वैदिकधर्माचे कट्टे अभिमानी होते, असे पुन्हा पुन्हा आवर्जून सांगितले आहे. एके ठिकाणी तो म्हणतो, "शक, पल्हव, यवन या ज्या परकी जमाती पश्चिम भारतात येऊन स्थिरावल्या होत्या त्यांना वैदिक धर्मीय राजा विलिवयांकुर [गौतमीपुत्र सातकर्णी] याने कायमचे शत्रुस्थानी लेखले होते. नहपानाच्या सत्तेचा समूळ निःपात करून त्याने त्या शत्रूंनी जिंकलेले प्रदेश परत घेतले. अखिल हिंदूंना आणि विशेषतः सनातन ब्राह्मणीधर्माच्या हिंदूंना भारतबाह्य परकीयांचा जो द्वेष वाटत असे त्यातूनच विलिवयांकुर राजाला शक-यवनांच्या पारिपत्यांची प्रेरणा मिळाली होती." हा उतारा देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात :
 क्वचित, भारतावरील या इतिहासकार स्मिथच्या इंग्लिश साम्राज्याचेही कट्टर शत्रू हिंदू हेच होते या त्याच्या स्वानुभवाचे शल्यही त्याच्या वरील वाक्यात व्यक्तविले गेले असावे.

[समग्र सावरकरवाङ्मय. खंड ४ था. पृ. ६७७]

 प्राचीन काळी, भारतात द्रविड, असुर, नाग, राक्षस, निषाद, यवन, किरात, कैवर्त, कांबोज, दरद, खस, शक, कुशान, पणी, आंध्र, पुलिंद, मूतिब, पुंड्र, भरत, यादव, भोज अशा अनेक जमाती चिरवसती करून राहिल्या होत्या. त्यांना एकरूप देण्यात, त्यांतून एक समाज निर्माण करण्यात आर्य यशस्वी झाले, एवढेच नव्हे तर त्या समाजात दार्ढ्य निर्माण करून, त्याला संघटित करून त्याच्या ठायी बल, सामर्थ्य व दुर्जय अशी प्राणशक्ती निर्माण करण्यातही त्यांना अपूर्व यश आले, याविषयी वरील इतिहासदर्शनानंतर कोणाला शंका राहील असे वाटत नाही. ग्रीक, शक, कुशाण, हूण यांनी पुनः पुन्हा केलेल्या आक्रमणांचा निःपात करून भारताचे स्वत्त्व नष्ट करू पहाणाऱ्या त्या जमातींना आपल्या अभ्यंतरात पूर्णपणे विलीन करून त्यांनाच भारतीय बनवून टाकण्याइतके शस्त्रबळ व धर्मबळ त्यांच्या ठायी होते. त्याचप्रमाणे धर्म, तत्त्वज्ञान, विद्या, कला यांची जोपासना करण्यासाठी आणि गोधन, कृषिधन, सुवर्णधन यांनी ही भूमी संपन्न करण्यासाठी मोठमोठी साम्राज्ये स्थापन करण्यास अवश्य ते बुद्धिबल व अवश्य ते संघटनकौशल्यही त्यांनी परिणत केले होते. मौर्यांचे साम्राज्य, सातवाहनांचे साम्राज्य, गुप्तसाम्राज्य, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट