पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

मिहिरगुल या हूणांच्या नायकांनी पुराणकाळच्या दैत्यदानवांनाही फिके ठरविले. पृथ्वीचा अंत जवळ आला असेच त्या प्रदेशात भासू लागले. मगधाचे राजे अत्यंत कर्तृत्वहीन होते. त्यामुळे सर्वत्र घोर निराशा पसरली होती. पण अजूनही भारतात राष्ट्रनिष्ठा जागृत होती. तिच्या बळावरच माळव्याचा राजा यशोधर्मा याने अनेक हिंदुराजांची संघटना उभारली आणि मिहिरगुलाला रणांगणात गाठून त्याचा संपूर्ण पराभव करून भारताला प्राणांतिक संकटातून सोडविले.

संभूय समुत्थान :

 यशोधर्म्याच्या या विजयाला अनेक दृष्टींनी महत्त्व आहे. तो काही सम्राट नव्हता. तरी अनेक राजसत्तांची तो संघटना करू शकला. समानसंकट दिसताच आपसातील क्षुद्र भेदभाव, मत्सर, अहंकार यांना विवेकाने जिंकण्याचे सामर्थ्य लोकांत असणे हे त्यांच्या जिवंतपणाचे, स्वत्वाचे, स्वाभिमानाचे, जागृत निष्ठेचे लक्षणच होय. त्याची प्रतीती या वेळी आली. यशोवर्म्याच्या ध्वजाखाली मगधाचा वलादित्यही आला होता. तो नामधारी का होईना पण सम्राट होता. तरी तो या राजसंघटनेत सामील झाला हा त्याच्या विवेकाचा प्रभाव होय. संघटनविद्या म्हणजेच जगण्याची विद्या अजून भारत विसरला नव्हता असे यावरून निश्रयाने म्हणता येते.
 दुसरी एक महत्त्वाची गोष्ट. तोरमाण, सिहिरगुल हे शिवोपासक होते. म्हणजे भारतीय वैदिक धर्मानुयायी राजांना ते स्वधर्मीय होते, पण यशोधर्मा व त्याचे सहकारी राजे यांनी हा विचार राष्ट्ररक्षणाच्या आड येऊ दिला नाही. त्याला त्यांनी शत्रूच लेखिले. उलट बौद्धांची वृत्ती पहा. पुष्यमित्र शुंग याच्या वेळी आक्रमण करून आलेला मिनँडर हा ग्रीकराजा बौद्ध झाला होता. वास्तविक तरीही भारताचा तो शत्रूच होता. पण बौद्धांनी हे ओळखले नाही. व त्यांनी त्याचा पक्ष घेतला. पुष्यमित्राने त्यांच्यावर शस्त्र धरले ते याच कारणाने. [प्रो. जगन्नाथ- काँप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया; खंड दुसरा. पृ. ९९. डॉ. जयस्वाल यांचाही आधार या विधानासाठी प्रो. जगन्नाथ यांनी दिला आहे.] एरवी पुष्यमित्र हा हिंदु वैदिक परंपरेप्रमाणे धर्मसहिष्णूच होता. पण राष्ट्रद्रोही अन्यपंथीयांनाच नव्हे तर अन्यधर्मीयांनाही राष्ट्रनिष्ठ