पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज-संघटनातत्त्व
४५
 

केले. पण येवढ्यावर हे भागले नाही. त्यांच्या कारकीर्दीतच शककुशाणांच्या इतकेच हिंस्र असे जे हूण त्यांच्या आक्रमणाचे प्रलयंकर धक्के भारताला बसू लागले. आणि भारताच्या संघटनसामर्थ्याची, त्याच्या संघटनतत्त्वाची व भारतीयांच्या राष्ट्रनिष्ठेची पुन्हा एकदा रणकुंडात परीक्षा होण्याची वेळ आली.

भारत व इतर जग :

 हूणांच्या स्वाऱ्या म्हणजे जगावरचेच संकट होते. मध्य आशियातून निघून या टोळधाडी प्रथम चीनवर तुटून पडल्या. जाळपोळ, लूट, कत्तली करून त्यांनी चीनचा मुलूख वैराण करून टाकला, शस्त्रबळाने त्यांचा प्रतिकार करणे चीनला अशक्य झाले; म्हणून आपल्या सीमेवरती त्याने ती प्रसिद्ध चिनी भिंत बांधली. यानंतर हूणांची एक काळलाट युरोपवर पसरली. या हिंस्र रानटांनी रशिया पायदळी तुडवून डॅन्यूबपर्यंत मजल मारली व शेकडो मैलांचे प्रदेश बेचिराख करून टाकले. अटिल्ला हा त्यांचा पुढारी म्हणजे संहारासुरच होता. रोमन साम्राज्यही त्याने हादरून कोसळून टाकले. मुंडक्यांच्या राशी करून त्यावर बसण्यात त्याला आनंद वाटत असे. इ. स. ४५३ मध्ये याचा मृत्यू झाल्यावर हूणांचे हे तुफान भारताकडे वळले. पण चीन, रशिया व मध्य युरोप यांच्यापेक्षा भारतात त्याला निराळा अनुभव आला. गुप्तवंशातील कुमारगुप्ताचा मुलगा स्कंदगुप्त नुकताच गादीवर आला होता. त्याने या क्रूर हिंस्र काळलाटेचे आव्हान स्वीकारले व पाटलीपुत्राहून निघून तो वायव्य सरहद्दीवर जाऊन हिमालयीन पहाडासारखाच तेथे उभा राहिला. अनेक वेळा हूणांच्या तुफानी काळलाटा त्याच्यावर आदळल्या पण दरवेळी त्या फुटून गेल्या व सम्राट स्कंदगुप्त अभंग राहिला. दरवेळी धडक देताच आपलाच कपाळमोक्ष होतो हे कालांतराने हूणांच्या जड डोक्यात शिरले. मध्य आशिया, चीन, रशिया, मध्य युरोप या प्रदेशांत मुसंडी मारून वराहवेगाने सहज प्रवेश करणाऱ्या या श्वापदांच्या टोळ्यांना भारताच्या भूमीवर आपले खूरही या वेळी ठेवता आले नाहीत. पुढे स्कंदगुप्ताच्या वृद्धापकाळात भारतावर पुन्हा ही टोळधाड आली. या वेळीही स्कंदगुप्त पुन्हा त्यांच्यावर चालून गेला. पण त्याला शिबिरातच मृत्यू आला. त्यामुळे हूणांना रान मोकळे मिळाले. आणि मग जवळ जवळ पन्नास- साठ वर्षे पश्चिमोत्तर भारतात मृत्यूचे तांडवनृत्यच चालू होते. तोरमाण व