पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

शकांना नर्मदापार केले. याच वेळी उत्तरेत यौधेय व मालव या गणराज्यांनी शकांना असाच प्रखर प्रतिकार केल्यामुळे त्यांच्या आक्रमणाचा कणाच मोडला. पण याच वेळी शकांपेक्षाही भयंकर अशा कुशाणांचे आक्रमण भारतावर आले. त्यांचा मोठा राजा कनिष्क याने तर उत्तरपश्चिम भारतावर साम्राज्यच प्रस्थापित केले. या वेळी मात्र कुशाणांना तीव्र प्रतिकार झाला नाही. अखिल भारताचे सामर्थ्य संघटित करील असा महापुरुष या वेळी कोणीच जन्माला आला नाही. त्यामुळे कुशाणसत्तेचे निर्मूलन लगोलग झाले नाही. आणि त्यांच्या आश्रयाने शकही उत्तरेत दीर्घकाळपर्यंत टिकून राहिले.
 पण शककुशाणांचे शस्त्रबळाने राजकीयदृष्ट्या निर्मूलन झाले नाही तरी त्यांच्या शककुशाणत्वाचे निर्मूलन मात्र निश्चित झाले. कारण या दोन्ही जमातींनी संपूर्ण भारतीय धर्माचा स्वीकार केला. नहपानाचा जावई उषवदात व पुढील शकराजा रुद्रदामन यांनी संपूर्णपणे हिंदुधर्माचा स्वीकार केला. ते ब्राह्राणांना दाने देऊ लागले, लक्षभोजन घालू लागले. त्यांनी भारतीय नावे स्वीकारली आणि संस्कृत भाषेचा अभिमान धरून आपले शिलालेख संस्कृतातच कोरविले. कुशाणांचा राजा कनिष्क हा बौद्ध झाला व अशोकाप्रमाणेच त्याने बौद्धधर्माचा प्रसार भारतात व बाहेरही केला. त्याने अखिल बौद्धपरिषदही भरविली. त्या वेळीच बौद्धांच्या महायान पंथाची स्थापना झाली. कनिष्क संस्कृत भाषेचाही अभिमानी होता. त्याने बौद्ध तत्त्वज्ञानाचे ग्रंथ संस्कृतात लिहविले. आश्चर्याची गोष्ट अशी की, कनिष्क हा बुद्धाबरोबर रुद्राचीही उपासना करीत असे ! त्याचा नातू याने तर वासुदेव हे आर्य नाव धारण करून वैदिकधर्माचाच स्वीकार केला. त्याच्या नाण्यावर शिव आणि नंदी यांच्या प्रतिमा आहेत. तेव्हा शककुशाणांची आक्रमणे परक्यांची खरी, पण कालांतराने तेच भारतीय झाले, येथला धर्म व संस्कृती त्यांनी स्वीकारली व आपले परकीयत्वच बव्हंशी नष्ट करून टाकले. तरीही त्यांच्या आणि भारतीयांच्या मनात, ते सत्ताधारी असेपर्यंत, काही अंशी ती जाणीव शिल्लक होती. पुढे चौथ्या शतकात समुद्रगुप्ताने कुशाणांचा समूळ उच्छेद केला आणि त्याच्यामागून त्याचा पुत्र चंद्रगुप्त (२ रा) विक्रमादित्य याने शकांचे निर्मूलन केले. त्यानंतर ती जाणीव समूळ नष्ट होऊन शककुशाण भारतीय संस्कृतीत पूर्ण विलीन झाले. या वेळी भारतीय लोक संघटित सामर्थ्य निर्माण करू शकतात हे पुन्हा एकदा गुप्तवंशाने सिद्ध