पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज-संघटनातत्त्व
४३
 

पीडित झाला नव्हता. कलिंगाचा महाप्रतापी राजा खारवेल याने डेमिट्रियसशी मुकाबला करून त्याला सीमापार केले. त्यानंतर चार वर्षांनी मिनँडर हा ग्रीक पुन्हा स्वारी करून आला होता. या वेळी मगधसम्राट बृहद्रथ याच्या नाकर्तेपणाची सर्वांनाच चीड आली होती. त्याच्या प्रतिकारशून्य शांततेमुळे लोक संतप्त झाले होते. ही संधी साधून त्याचा सेनानी पुष्यमित्र याने त्याचा शिरच्छेद केला आणि स्वतः सम्राटपदावर येऊन त्याने मिनँडरवर चालून जाऊन त्याच्या सेनेचा निःपात केला व भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखले. या दोन्ही आक्रमणांच्या वेळी भारताच्या सीमा हिंदुकुशपर्यंत आहेत याची खारवेल, पुष्यमित्र या दोघांनाही जाणीव होती. शत्रूचा तेथपर्यंत पाठलाग करून त्याला सीमेच्या बाहेर काढल्यानंतरच ते थांबले. ही घटना इ. पू. १८४ या वर्षी घडली. व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो, 'यानंतर जवळजवळ १७०० वर्षांत भारतावर पाश्चात्त्यांचे आक्रमण झाले नाही.' (अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया, पृ. २१०)

शस्त्रबळ आणि धर्मबळ :

 पुष्यमित्राच्या शुंग वंशाने सुमारे शंभर वर्षे राज्य केले. आणि त्यानंतर पुढील चारशे वर्षात उत्तरभारतात दुर्दैवाने पराक्रमी असा सम्राट झाला नाही. आणि याच काळात ग्रीकांच्यापेक्षा शतपटीने भीषण अशी शककुशाणांची महाभयंकर आक्रमणे भारतावर कोसळत होती. हे शककुशाण म्हणजे केवळ हिंस्त्र श्वापदांच्या टोळ्या होत्या. कत्तल, आग, लूट, विध्वंस हाच त्यांचा आनंद होता. त्यांनी केवळ भारतालाच नव्हे तर कास्पियन समुद्रापासून चीनपर्यंत सर्व देशांना त्राही भगवान करून सोडले होते. फरक एवढाच की भारताने शस्त्रबळाने व धर्मबळाने त्यांना आपल्या अंतरात विलीन करून या रानटांचे नावही भारतात उरू दिले नाही.
 उत्तरेस मोठा पराक्रमी सम्राट झाला नाही हे खरे, पण त्या वेळी दक्षिणेने ही जबाबदारी शिरावर घेतली. पैठणच्या सातवाहनांवर शकांची धाड कोसळली होती. पन्नास एक वर्षे त्यांची नाशिक, जुन्नरपर्यंत सत्ताही प्रस्थापित झाली होती. पण या वेळी सातवाहन कुलातील गौतमीपुत्र सातकर्णीचा उदय झाला व त्याने शकांशी तुंबळ संग्राम करून त्यांचा राजा नहपान यास ठार मारले व