पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज-संघटनातत्त्व
४१
 

आवाहन अत्यंत मानवले व त्यांतील सर्व सेना चंद्रगुप्ताच्या ध्वजाखाली गोळा झाल्या. हे भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते, आणि त्याचा नेता चंद्रगुप्त हाच होता, हे रोमन इतिहासकार जस्टिन यानेही लिहून ठेविले आहे. राष्ट्रनिष्ठेला अवश्य ते आपपरभाव, ते रागद्वेष त्या गणराज्यांतील नागरिकांच्या मनात किती निश्चित झाले होते हे यावरून दिसून येते. भारतवर्ष ही त्यांची मायभूमी होती म्हणून शिकंदर त्यांना पर होता, शत्रु होता. म्हणूनच त्याच्या आक्रमणाचा त्यांनी प्रखर प्रतिकार केला. तशी निष्ठा त्यांच्या मनात नसती तर त्यांनी शिकंदरच्या मॅसिडोनियन सैन्याचे मुक्तिसेना म्हणून कम्युनिस्टांच्या पद्धतीप्रमाणे स्वागत केले असते. पण त्यांनी स्वागत केले ते चंद्रगुप्ताचे. आणि ते स्वातंत्र्य सेनेचे नेताजी म्हणून. कारण तो त्यांना स्वकीय होता. स्वातंत्र्ययुद्ध हा दिव्य अग्नी आहे. त्यात माणसांचे क्षुद्र अहंकार वितळून जातात. शिकंदराशी सामना करण्याचे ठरताच मालव व क्षुद्रक यांनी आपली भिन्न गणराज्ये एक करण्याचे ठरविले हे वर सांगितलेच आहे. आता सर्व गणराज्यांनी भारतराष्ट्रात आपले अहंकार वितळवून चंद्रगुप्ताच्या सेनासागरात विलीन व्हावयाचे ठरविले. चंद्रगुप्ताच्या सेनेत प्रामुख्याने भरती, शिकंदराशी जी गणराज्ये लढली, त्यांच्याच सैनिकांची होती, असे मॅकक्रिंडल म्हणतो ते अगदी खरे आहे. पण चंद्रगुप्त तेवढ्यावरच थांबला नाही. त्याचे स्वप्न फार भव्य होते. त्याच्या आकांक्षांना गगन ठेंगणे होते. त्यामुळे त्याने व चाणक्याने सर्व राजसत्ताक प्रदेशांतही दौरा काढला व प्रचंड सेना उभारली. (उक्तग्रंथ, डॉ. मुकर्जी. पृ. ३. तळटीप.) पुढील तीन-चार वर्षात सर्व विंध्योत्तर भारतात महाराज चंद्रगुप्त साम्राज्य स्थापू शकले ते याच संघटनेच्या बळावर नंतर दहा-पंधरा वर्षांनी ग्रीक सेनापती सेल्यूकस निकेटर शिकंदराप्रमाणेच भारतावर चालून आला तेव्हा त्यांनी त्याला धूळ चारिली ती याच संघटित सामर्थ्याच्या पुण्याईने आणि पुढे थोड्याच वर्षांत अखिल भारतावर महाराजांनी मौर्य साम्राज्य प्रस्थापित केले आणि सांकृतिकदृष्ट्या एकरूप असलेल्या भारतवर्षाचे भारतराष्ट्रात रूपांतर केले तेही लोकांच्या मनांत दृढमूल असलेल्या याच भारतनिष्ठेच्या दिव्य शक्तीने.
 परकीय आक्रमकांचा, सर्वस्वाचा होम करून, प्राणपणाने प्रतिकार करण्याची ही भारतीयांची परंपरा पुढे सुमारे एक हजार वर्षे तरी चालू होती.