पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

शिरच्छेद केला. फिलिप या दुसऱ्या सत्रपाचाही असाच शिरच्छेद झाला. शिकंदराच्या सत्तेला हे सरळ आव्हानच होते. पण ते स्वीकारण्याचे सामर्थ्य त्याला नव्हते. त्याने दुसऱ्या एका भारतीय सत्रपाला याचा बंदोबस्त करण्यास आज्ञा दिली व तो पुढे निघून गेला. हे, तो जिवंत असताना ! मग त्याच्या मृत्यूनंतर काय झाले असेल याची सहज कल्पना येईल. भारतीयांच्या मनात या परकी सत्तेविषयी केव्हाच प्रेम नव्हते. कडवा द्वेष होता. त्यामुळे शिकंदराच्या मृत्यूची वार्ता पसरताच ग्रीकांचे सुभेदार, त्यांचे ध्वज, त्यांच्या वसाहती, जे जे म्हणून ग्रीक चिन्ह मागे उरले होते ते त्यांनी समूळ नष्ट करून टाकले व पारतंत्र्याचा कलंक धुऊन काढला. आणि थोड्याच दिवसात एक वावटळ यावी व जावी तसा प्रकार होऊन शिकंदराचे आक्रमण भारतात नामशेषही राहिले नाही. [ए कॉंप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २ रा, प्रकरण १ ले, लेखक डॉ. आर. के. मुकर्जी.]

पहिले स्वातंत्र्ययुद्ध :

 पण शिकंदराच्या मृत्यूनंतर दुसरी जी महान घटना भारतात घडून आली तिला हिंदूंच्या संघटित सामर्थ्याच्या दृष्टीने जास्त महत्त्व आहे. ती म्हणजे चंद्रगुप्त मौर्य याचा उदय ही होय. इतिहासकाळात या महापुरुषानेच भारताला प्रथम राष्ट्र पदवी प्राप्त करून दिली. शिकंदराची स्वारी आली त्या वेळी तक्षशिलेच्या विद्यापीठात आर्य चाणक्य याच्या हाताखाली तो शिक्षण घेत होता. चाणक्याने परकी सत्तेविषयीचा द्वेष त्याच्या रोमरोमात भिनवून दिला होता. 'परकी सत्ताधाऱ्याला या प्रदेशाबद्दल ममत्व नसते, त्याने तो देश पाशवी बळाने जिंकलेला असतो, म्हणून तो प्रजेला पिळून काढतो व संपत्ती धुऊन नेतो,' हे अर्थशास्त्र या चाणक्याच्या ग्रंथातील वर्णन प्रसिद्धच आहे. [अधिकरण ८ वे. प्रकरण २ रे.] अशा तेजस्वी शिक्षणाने चंद्रगुप्ताचे मन राष्ट्रनिष्ठेने भारून गेले होते. शिकंदर परत फिरताच उध्वस्त झालेल्या गणराज्यांतून, त्याने अखिल आर्यावर्ताचे एकराज्य घडविण्याच्या कल्पनेचा प्रचार करण्यास प्रारंभ केला. आणि जी गणराज्ये प्राणपणाने शिकंदराशी लढली त्यांना स्वातंत्र्याचे, एकराज्याचे व समाजसंघटनेचे हे