पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज-संघटनातत्त्व
३९
 

त्याच्याविरुद्ध उठण्याचा उपदेश करीत. त्यामुळे शिकंदराने अशा कित्येक उपदेशकांना फाशी दिले.' [उक्तग्रंथ, पृ. १९५] ग्युसिकॅनस या राजाला एकदा शिकंदराने नमविले होते, पण त्याने मागून परत उठावणी केली. त्याला शिकंदरने पुन्हा पकडले तेव्हा त्याला असे कळले की या उठावणीमागे अनेक ब्राह्मण आहेत. तेव्हा शिकंदराने त्याला व त्याच्याबरोबर त्या ब्राह्मणांनाही देहदंडाची शिक्षा दिली. [उक्तग्रंथ, पृ. ७७, ७८] एक्रेप्रसंगी तर एका ब्राह्मणाने निर्भयपणे शिकंदराच्या तोंडावर उत्तर दिल्याचे प्लुटार्कने नमूद करून ठेविले आहे. 'तू सवास याला माझ्याविरुद्ध बंड करण्याची चिथावणी का दिलीस?' असे त्याने विचारले तेव्हा त्या ब्राह्मणाने शांतपणे उत्तर दिले, 'त्याने मानाने जगावे व मरावेही मानानेच, असे मला वाटले म्हणून.' [पृ. २०१]
 सिंधूच्या दोन्ही तीरांवर असलेली ही प्राजके (गणराज्ये) व राजके वैदिक धर्माची अभिमानी होती. कठगण हा तर 'कठोपनिषद' व 'काठक- संहिता' यांमुळे भारतात अमर झाला आहे. हे सर्व कृष्णयजुर्वेदी असून त्यांचे काठकधर्मसूत्र विष्णुस्मृतीचा मूलाधार म्हणून प्रसिद्ध आहे. क्षुद्रक- गणाचे लोकही तत्त्वज्ञानातील पांडित्यासाठी शिकंदराच्या वेळी प्रसिद्ध होते. [हिंदू पॉलिटी- डॉ. जयस्वाल, पृ. ७७] क्षुद्रक व मालवगणातील ब्राह्मण हे तत्त्वज्ञानाप्रमाणेच रणपांडित्यातही प्रसिद्ध होते. शिकंदराशी झालेल्या लढाईत ५००० ब्राह्मणांनी धारातीर्थी देह ठेविले. कर्टिस म्हणतो की, 'हे लोक कडवे असल्यामुळे शिकंदाराला कैदी असे फारच थोडे मिळाले. बहुतेकांनी मरण पतकरिले.' झेलम व चिनाब यांच्या संगमावरील, ग्रीक इतिहासकारांनी उल्लेखिलेले 'सिबोई' म्हणजे ऋग्वेदातील 'शिव' जमातीचे लोक होत. [काँप्रिहेन्सिव्ह हिस्टरी- खंड २ रा. पृ. १२५, १२७] या धर्माभिमानामुळेच त्यांची भारतवर्षावरील, मातृभूमीवरील निष्ठा अविचलित राहिली होती.
 भारतीयांच्या चित्तात राष्ट्रधर्म असा जागृत असल्यामुळे शिकंदराची पाठ फिरताच त्याने जिंकलेल्या प्रदेशांत सर्वत्र उठावणी होऊ लागली. दमारॅक्सस या भारतीय अधीपतीने शिकंदर तक्षशिलेला असतानाच कंदाहार प्रांतात बंडाची चेतवणी दिली होती. नंतर त्याचा परत प्रवास सुरू झाला तेव्हा अश्वकायन गणांनी त्याने नेमलेला सत्रप- राज्यपाल- निकॅनॉर याचा