पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

एक रात्र द्यावी, व येथून नऊ मैलांवरील एका टेकडीवर रात्रभर जाऊ द्यावे, अशी विनंती केली. शिकंदराने ती मान्य केली. पण रात्री त्या पठारावर गेल्यावर 'परकीय आक्रमकाच्या पक्षाने भारतीयांशी लढण्याचे पाप आपण करावयाचे नाही' असा त्यांनी निश्चय केला. आणि रातोरात निघून जाण्याचे ठरविले. पण याचा शिकंदराला सुगावा लागताच त्याने त्यांच्यावर अचानक छापा घातला. तरीही शरण न जाता त्या शूर शिपायांनी अखेरपर्यंत लढा देऊन धारातीर्थी मरण पत्करले. त्यांच्यातील स्त्रियाही हाती शस्त्र घेऊन लढल्या व त्यांनीही मृत्यूला कवटाळले. डियोडोरस म्हणतो, 'अपमानित जिण्यापेक्षा हे मानाचे मरणच त्यांना श्रेयस्कर वाटले.' (क्लासिकल अकाउंटस्. आरियन, पृ. १३, डियोडोरस, पृ. १६३)
 मालव आणि क्षुद्रक अशी दोन गणराज्ये सिंधूच्या तीरावर होती. त्यांचे पिढीजात वैर होते. पण शिकंदराशी सामना द्यावयाचे ठरताच त्यांनी ते वैरही विसरावयाचे ठरविले. आणि ऐक्यबंध दृढ करून टाकण्यासाठी दोन्ही गणराज्यांनी आपापसात कन्यादाने करून १०००० विवाह घडवून आणले. पण त्यांची सैन्ये एक होण्याच्या आधीच शिकंदराने त्यांच्यावर छापा घातला व सहस्रावधी लोकांची कत्तल केली. पण याच संग्रामात एका नगरीच्या तटावरून शिकंदराने आत उडी मारली त्या वेळी एका हिंदी वीराने एक विषदिग्ध बाण त्याला मारला. त्यामुळे शिंकंदर रक्ताच्या थोराळ्यात कोसळला. या अपघातातून तो मरता मरता वाचला. काही दिवस तर तो मेला अशीच अफवा उठली होती. त्यामुळे त्याच्या साम्राज्यात बंडाळ्याही झाल्या. (उक्तग्रंथ- डियोडोरस, पृ. १७६)

राष्ट्रनिष्ठेचे तत्त्वज्ञान :

 भारतीयांच्या ठायी दिसून आलेली ही राष्ट्रनिष्ठा ही सहजगत्या झालेली गोष्ट नव्हती. या भूमीत त्या निष्ठेचे तत्त्वज्ञान बुद्धिपूर्वक, प्रयत्नपूर्वक रुजविण्यात आले होते. हे कार्य करणाऱ्या लोकांनाच ग्रीक ग्रंथकारांनी फिलॉसफरस्, जिमनोसोफिस्टस्, ब्राह्मण या नावांनी संबोधिलेले आहे. प्लुटार्क म्हणतो, 'लष्कराइतकाच या फिलॉसफरस्-नीही शिकंदराचा पिच्छा पुरविला. जे राजे त्याला शरण गेले त्यांची ते अत्यंत निर्भर्त्सना करीत आणि स्वतंत्र राज्यांना