पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज-संघटनातत्त्व
३७
 

स्वारीविषयी व येथल्या गणराज्यांनी त्याला जो प्रतिकार केला त्याविषयी जी माहिती येथे दिली आहे ती या प्राचीन ग्रीक-रोमन इतिहासकारांच्या आधारे दिली आहे.

कडवे रागद्वेष :

 शिकंद्राच्या अत्यंत प्रबळ अशा मॅसिडोनियन सेनेची अशी दुर्दशा कशाने झाली ते आता पाहावयाचे आहे. या काळापर्यंत भारतीय समाज एकरूप होऊन गेला होता आणि भारतवर्षाच्या सीमाही निश्चित झाल्या होत्या. आर्यांनी प्रस्थापिलेल्या यज्ञधर्माचे रूप आता पुष्कळच पालटले होते. पण तो वैदिक धर्म याच नावाने रूढ होता. व त्याचा आणि त्याने पवित्र झालेल्या भरतभूमीचा कडवा अभिमान लोकांच्या चित्तात दृढमूल झाला होता. त्यामुळे शिकंदर हा पर आहे, तो आक्रमक आहे, आपला धर्म व आपली भूमी यांचा तो शत्रू आहे याविषयी त्या सीमेवरील राज्यांतील नागरिकांच्या मनात अणुमात्र शंका नव्हती. स्वभूमीचे प्रेम व आक्रमकांचा द्वेष या राष्ट्रनिष्ठेच्या दोन बाजू आहेत. असे उत्कट रागद्वेष भारतीयांच्या मनात त्या वेळी होते म्हणूनच त्यांनी अत्यंत प्रखर असा प्रतिकार केला. वरवर पाहता त्यांना यश आले नाही. त्यांची राज्ये धुळीस मिळाली. त्यांच्या घोर कत्तली झाल्या. त्यांच्या स्त्रियांना जोहार करावे लागले. पण असे आत्म-बलिदान त्यांनी केले म्हणूनच शिकंदरला व्यास नदीपासून परत फिरावे लागले. नाही तर तो थेट पाटलीपुत्राला गेला असता व तेथल्या सिंहासनावर बसून भारताचा सम्राट म्हणून त्याने आपल्या नावाची द्वाही फिरविली असती. भरतभूमीच्या कपाळचा हा कलंक टळला, तिचे मुखमंडल पहिल्याप्रमाणेच मंगल चिन्हांनी मंडित राहिले, हे त्या सीमाभागातील लोकांनी केलेल्या बलिदानामुळेच होय. हे यश लहान आहे काय ?
 शिकंदर आणि भारतीय यांचा हा जो भीषण रणसंग्राम झाला, त्यात भारतीय राष्ट्रनिष्ठेनेच प्रेरित झाले होते, हे अनेक घटनांवरून निश्चित दिसते. मासागा येथे सात हजार लोकांची एक जमात शिकंदराच्या हाती सापडली. त्यांची कत्तल करण्याऐवजी शिकंदराने त्यांना सांगितले की, तुम्ही माझ्या सैन्यात सामील होत असाल तर, तुम्हांस जीवदान देऊन मी लष्करात ठेवून घेईन. त्या लोकांनी ते तात्पुरते मान्य केले व आम्हांस एकमत बनविण्यास