पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

लहान होते. त्यांचा जीव लहान होता. त्यामुळे शिकंदराच्या अफाट सेनासागराचा प्रतिकार करण्यात ती यशस्वी झाली नाहीत. शिकंदराला प्रत्येक वेळी जयच मिळाला. पण तो सुखासुखी मिळाला नाही. या गणराज्यांनी त्याला इतका कडवा प्रतिकार केला की, प्रत्येक तसून् तसू भूमी शिकंदराला लढूनच घ्यावी लागली. दर ठिकाणी तुंबळ रणकंदन करावे लागले. ते इतके की व्यास नदीपाशी येऊन पोचेपर्यंत त्याचे ते अफाट सैन्य हैराण होऊन गेले. आणि पलीकडे यौधेयगणांची कडवी सेना आपल्या स्वागतासाठी उभी आहे हे कळताच त्याने हाय खाल्ली. आणि तसेच पुढे जाण्याचा शिकंदराने आग्रह धरला तेव्हा सैन्यात बेदिली माजण्याची चिन्हे दिसू लागली. प्लुटार्क म्हणतो 'पौरवाशी [पोरसशी] झालेल्या लढाईतच मॅसिडोनियन सेना मनाने खचून गेली होती. त्यात तिने ऐकले की, पुढे एकेक राजा ८० हजार, दोन लक्ष अशी सेना घेऊन संग्रामास सिद्ध झालेला आहे. त्यामुळे शिकंदर पुढे जाऊ लागला तर त्याला निश्चयाने विरोध करावयाचा असे शिपायांनी ठरविले.' या प्रसंगाची अत्यंत करुण वर्णने ग्रीक व रोमन इतिहासकारांनी केलेली आहेत. शिकंदर गंगा ओलांडून मगधावर चालून जाण्याचा आपला आग्रह सोडीत नाही असे दिसू लागताच सैनिकांच्या काळजात धडकी भरली. व हजारो सैनिक रडू लागले. त्याच्या तंबूच्या दाराशी रडत, भेकत उभे राहून आम्हांला परत पाठवा म्हणून याचना करू लागले. या रडण्याचे व हताश होण्याचे एक कारण म्हणजे अनेक वर्षे बायकामुलांचा, घराचा झालेला वियोग हे होय, हे खरे. घरदार सोडून त्या सेनेला आठ वर्षे झाली होती. आणि मगधावर जावयाचे म्हणजे आणखी इतकीच वर्षे जाण्याचा संभव होता. पण बाबिलोन, इराण येथे विजय मिळाले तसे भारतात मिळाले असते तर, मगधच काय पण आसामपर्यंतसुद्धा आणि तेथून दक्षिणेत सातवाहनांच्या प्रतिष्ठानापर्यंतसुद्धा जाण्यास शिकंदराची सेना तयार झाली असती. पण पोलादी तट फोडूनच प्रत्येक पाऊल टाकावे लागणार हे दिसत असल्यामुळे मॅसिडोनियन सेना हताश होऊन रडू लागली यात शंका नाही. (दि क्लासिकल अकाउंटस् ऑफ इंडिया- संपादक- आर. सी. मजुमदार, पृष्ठ १३३, १९०, १९८. या पुस्तकात आरियन, कर्टिस, डियोडोरस, जस्टिन, प्लुटार्क इ. प्राचीन ग्रीक व रोमन इतिहासकारांच्या ग्रंथांतून हिंदुस्थान- विषयक उतारे निवडून संपादकांनी एकत्र करून छापले आहेत. शिकंदराच्या