पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज-संघटनातत्त्व
३५
 

विशुद्धी किंवा श्यामिका (हीण) यांची खरी परीक्षा अग्नीत होते. त्याचप्रमाणे लोकांच्या निष्ठेची खरी परीक्षा रणकुंडात होत असते. भारताच्या प्रारंभकाळीच भारताच्या राष्ट्रनिष्ठेची कसोटी लागली आणि तीत या सुवर्णभूमीतले हे सुवर्ण अगदी बावन्नकशी ठरले असा इतिहासवेत्त्यांनी आज एकमुखाने निर्वाळा दिला आहे. शिकंदराने भारतावर जे भीषण आक्रमण केले ते रणकुंड, आणि त्यातून भारताचे पहिले सम्राट महाराज चंद्रगुप्त मौर्य यांनी निर्माण केलेले अखिल भारताचे पहिले साम्राज्य हे शुद्ध सुवर्ण होय. हिंदुलोक फार प्रचंड असे संघटित सामर्थ्य निर्माण करू शकतात, हे इतिहासकाळात त्या वेळी प्रथम सिद्ध झाले.
 पारसीक राष्ट्राचे- इराणचे व ग्रीकांचे पिढीजात वैर. पण ग्रीकांची लहान लहान गणराज्ये त्या एकछत्री पारसीक साम्राज्यशक्तीपुढे फारशी टिकाव धरू शकत नसत. शिकंदरचा पिता फिलिप याने ग्रीकांचे एकराज्य निर्माण केले, व ते संघटित सामर्थ्य पाठीशी घेऊन शिकंदर विश्वविजयासाठी बाहेर पडला. पहिल्या धडाक्यालाच त्याने दरायसच्या पारसीक साम्राज्याचा विध्वंस केला व इराणचा सम्राट, म्हणून स्वतःच्या नावाची द्वाही फिरविली. वाटेत त्याने बाबिलोनी साम्राज्य असेच धुळीस मिळविले होते. त्यामुळे गंगेच्या काठचे मगध साम्राज्य असेच निर्दाळून हिंदुस्थानचा सम्राट म्हणून मिरवण्याची त्याला स्वप्ने पडू लागली. म्हणून त्याच जोसात तो तसाच वादळी वेगाने पुढे निघाला व भारतावर कोसळला. बाबिलोन, इराण येथे जशी कोपराने खणण्याजोगी मऊ भुसभुशीत जमीन सापडली तशीच येथे सापडेल असे त्याला वाटले होते. पण येथे त्याला पावलोपावली काळ्या, लोखंडी फत्तराची ठेच लागू लागली. आणि अखेरीस या फत्तरावर त्याच्या स्वप्नांच्या ठिकऱ्या होऊन, गंगाकाठच्या मगधसाम्राज्याचे दुरून दर्शन घेण्याचे भाग्यही न मिळता, त्याला रक्तबंबाळ अवस्थेत परत जावे लागले. विश्वविजेत्या त्या सेनानीचा हा दारुण मुखभंग कशामुळे झाला?

भारतांतील जिवंत राष्ट्रधर्मामुळे !

 भारताच्या सीमेवर त्या वेळी सिंधू नदीच्या दोन्ही तीरांवर सौभूती, कठ, मालव, क्षुद्रक, अग्रश्रेणी, पट्टनप्रस्थ अशी अनेक गणराज्ये (प्राजके- रिपब्लिकस्) व तक्षशिलेसारखी काही राजके सत्तारूढ होती. या राज्यांचे परिघ,