पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

भक्ती व्यक्तविली आहे. (विष्णु- २, ३, २. वायु ४५, ७७.) ब्रह्मपुराणाचा २७ वा अध्याय 'भारतवर्षानुकीर्तनम्' याच नावाने प्रसिद्ध आहे. 'जे नरश्रेष्ठ भारतवर्षात जन्माला येतात ते धन्य होत. देवांना या भूमीत जन्म मिळावा अशी फार इच्छा असते. या भरतभूमीच्या सर्व गुणांचे वर्णन करणे कोणाला शक्य आहे ?' असा या भूमीचा पुराणकाराने गौरव केला आहे. (ब्रह्मपुराण- आनंदाश्रमप्रत. अ. २७)
 वरील वचने अत्यंत स्फूर्तिदायक आहेत व भारताच्या प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी त्या जुन्या काळी राष्ट्रधर्माविषयीचे हे विचार सांगितले हे आपल्याला अत्यंत भूषणावह आहे, हे खरे. पण हे सर्व ग्रंथगत आहे. पुराणात आहे. प्रत्यक्षात या राष्ट्रनिष्ठेने भारून जाऊन, आपपरभाव निश्चित करून, मातृभूमीसाठी परकीय आक्रमकांशी प्राणपणाने हिंदुलोक संघटित होऊन लढले, या निष्ठेपायी त्यांनी सर्वस्वाचा होम करून घेतला आणि या दिव्य निष्ठेने प्रेरित होऊन भारताच्या लोकसमुदायातून एक प्रबल समर्थ व संपन्न असे राष्ट्र त्यांनी निर्माण केले, असे कधी घडले आहे काय, ऐतिहासिक कालात घडले काय, असा प्रश्न आहे. तसे झाले असेल तरच वरच्या ग्रांथिक विचारांचे महत्त्व. नाही तर आज भारतात काय कमी आहे? राष्ट्रनिष्ठा, भारतनिष्ठा, मातृभूमीची भक्ती, सर्वस्वाचा त्याग यांविषयी लेखन व उपदेश भारतात टनावारी चालू आहे. पण असा एक तरी पक्ष भारतात आहे काय की ज्याला राष्ट्रनिष्ठ म्हणता येईल? भारतीय जीवनाचे एक क्षेत्र तरी असे आहे काय की जेथे या निष्ठेने कार्यकर्ते प्रेरित झालेले आहेत? राजकारणात तर राष्ट्रनिष्ठा औषधाला तरी सापडेल की नाही याची शंका आहे. तेव्हा केवळ ग्रांथिक तत्त्वज्ञान सांगितलेले आहे, याला फारसे महत्त्व नाही. ते तत्त्वज्ञान लोकांच्या जीवनात, प्रत्यक्षात किती आचरले जाते यावर सर्व अवलंबून आहे. म्हणून हे पहावयास हवे की, भारतात प्राचीन काळी ही निष्ठा प्रत्यक्षात किती अवतरली होती? तिच्यामुळे या भूमीत संघटित सामर्थ्य किती निर्माण झाले होते ?

शिकंदराच्या काळी :

 वर सांगितलेच आहे की कोणतेही संघटनातत्त्व समाजात किती प्रभावी आहे याची खरी कसोटी परकीय आक्रमणाच्या वेळी लागते. सोन्याची