पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

झाले ते आपण पाहिले. पण येवढ्याने राष्ट्रनिष्ठा पूर्णतेस जात राही. या भूमीविषयी जाज्वल्य अभिमान, येथल्या परंपरांविषयी तशीच उत्कट आत्मीयता आणि त्यांच्या संरक्षणासाठी आत्मबलिदान करण्याची सिद्धता एवढा भावार्थ राष्ट्रनिष्ठेत सामावलेला असतो. त्या अभावी ती राष्ट्रनिष्ठा वंध्याच राहते. तिच्यातून सामर्थ्य निर्माण होत नाही. वेदवाङ्मयात राष्ट्रनिष्ठेतील हा सर्व भावार्थ दृग्गोचर होतो ही भारताला अत्यंत भूषणावह अशी गोष्ट आहे. अथर्ववेदाच्या पृथ्वीसूक्तात या सर्व भावनांचा सुक्तकाराने उत्तम आविष्कार केला आहे. सूक्तकार म्हणतो-

यत् ते भूमे विखनामि क्षिप्रं तदपि रोहतु ।
मा ते मर्म विमृग्वरि मा ते हृदयमर्पिपम् ॥ ३५ ॥

 हे भूमि ! मी जी जागा खणतो ती शीघ्र प्राणतत्त्वाने भरून जावो. माझ्या हातून तुझ्या मर्मावर आघात न होवो. वा तुझ्या हृदयाला माझ्या हातून व्यथा न होवो.

इन्द्रो यां चक्र आत्मनेऽअनमित्रां शचीपतिः ।
सा नो भूमिः विसृजतां माता पुत्राय मे पयः ॥ १० ॥

 शचीपति इंद्राने जिला शत्रुरहित केली ती ही भूमाता आपला पुत्र असलेल्या मला दूध-पोषक द्रव्य- देवो.
 भूमीला माता म्हणून संबोधिल्यानंतर तिचे अन्नधन, गोधन, विपुलोदक नद्या, हिरण्य, रत्नमाणके, नानावीर्या औषधी, हे जे वैभव त्याचे कवीने मोठे बहारीचे वर्णन केले आहे.
 कवीने या भूमीच्या उज्ज्वल परंपरेवरील आपली भक्ती अशीच मोठ्या तेजस्वी शब्दांत प्रगट केली आहे. तो म्हणतो, 'ज्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी आपले अद्भुत पराक्रम केले, ज्या ठिकाणी देवांनी असुरांचा विध्वंस केला, ती ही आमची जन्मभूमी आम्हांला ऐश्वर्य व तेज देवो. हे शत्रुमर्दिनी भूमाते ! जे आमचा द्वेष करतात, जे सेना घेऊन आमच्यावर आक्रमण करतात व आमचा नाश करण्यासाठी टपून बसलेले असतात त्यांचा तू नाश