पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज-संघटनातत्त्व
३१
 

तेथपर्यंत आर्यावर्ताच्या सीमा, असे जुन्या ग्रंथांत अनेकदा सांगितलेले आहे. कृष्णमृग हा अग्नीचा अवतार मानीत. त्यावरून हा अर्थ स्पष्ट दिसतो की आर्यांची यज्ञसंस्कृती जेवढ्या प्रदेशात पसरली तेवढ्या भूमीला ते आर्यावर्त म्हणू लागले. मनूच्या मते विंध्य पर्वताच्या उत्तरेचा आणि हिमालय व पूर्व- पश्चिम समुद्र यांनी सीमित केलेला सर्व भूभाग (म्हणजे उत्तर भारत) हा आर्यावर्त होय. या भागात राहणारे ते आर्य व बाहेरचे ते म्लेंच्छ असे तो म्हणतो. यावरून आता आपपरभाव भूमीवर ठरू लागले असे दिसून येईल. मात्र अजून यज्ञसंस्कृतीचे, त्या कल्पनांचे वर्चस्व कमी झालेले नाही हे स्पष्ट आहे. म्लेंच्छ या शब्दाचा मूळ अर्थ अशुद्ध बोलणारे, असा आहे हेही येथे ध्यानात ठेवले पाहिजे. यानंतर पाणिनि- उत्तरकाळी आर्यांचा दक्षिणेतही प्रवेश झाला व काही शतकांतच त्यांनी कन्याकुमारीपर्यंत सर्व प्रदेशाचे आर्यीकरण करून टाकले. तेव्हा आर्यावर्ताला आता शास्त्रकार भारतवर्ष म्हणू लागले. आणि हिमालय व पश्चिम, दक्षिण व पूर्व समुद्र या सीमांतील देश तो भारतवर्ष अशा त्याच्या मर्यादा सांगू लागले. शबर स्वामी (इ. स. ५ वे शतक) आपल्या जैमिनीभाष्यात सांगतात की, हिमालयापासून कुमारीपर्यंत भाषा व संस्कृती यांचे संपूर्ण ऐक्य आहे. चाणक्याने आपल्या दूरदृष्टीने हे आधीच पाहिले होते. (इ. पू. ४ थे शतक) चक्रवर्तिक्षेत्राची मर्यादा त्याने 'हिमवत् समुद्रान्तरम्' अशी सांगितली आहे. धर्माने, संस्कृतीने जो समाज एकरूप केला तो राजसत्तेने एक झाला पाहिजे हा त्याचा आग्रह यात स्पष्ट दिसतो. श्रीकृष्णांनी असाच प्रयत्न केला होता हे मागल्या प्रकरणात सांगितलेच आहे. सर्व भारत हा आर्य झाल्याचे व ही सर्व भूमी पवित्र ठरल्याचे आणखी एक द्योतक म्हणजे गंगा यमुनांच्या बरोबरीने गोदावरी, कावेरी या नद्या पवित्र ठरल्या, दक्षिणेतल्या नगरी व पर्वतही तीर्थक्षेत्राच्या यादीत समाविष्ट झाले आणि भरतभूमीचा 'समुद्ररशनादेवी' असा निर्देश शास्त्रकार करू लागले. (धर्म- शास्त्राचा इतिहास, खंड २ रा, भाग १ ला, पृ. ११ ते १८. म. म. पां. वा. काणे व संस्कृतिसंगम- पृ. २४३. द. के. केळकर.)

राष्ट्राभिमान :

 यज्ञभक्तीचे पर्यवसान हळूहळू त्या यज्ञाने पावन झालेल्या भूमिभक्तीत कसे