पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

दडपून टाकतो." (ऋग्वेद ७.६.२) अनेक ठिकाणी दस्यूंचे वर्णन कर्महीन, (यज्ञहीन) कर्मरहित, अग्नीला हविर्भाग न देणारे, त्याचप्रमाणे मृध्रवाच, असे केलेले असून आर्याचे वर्णन यज्ञकर्ते, अग्निपूजक, अग्निहोत्र धारण करणारे असे केलेले आहे. अनेक ऋचा देऊन ज्ञानकोशकारांनी आर्य व अनार्य (दस्यू) यांतील भेद यजनविषयक आहे, वांशिक नाही, असा निर्णय दिला आहे. (बुद्धपूर्व जग- प्रकरण ३ रे.) याचा अर्थ असा की, आर्यांनी धर्म हे संघटनातत्त्व निश्चित केले होते. 'यज्ञ' हा त्यांचा धर्म होता. ते त्यांचे दैवत होते. त्या देवतेचे व तिच्या पूजनातून निर्माण झालेल्या संस्कृतीचे उपासक ते स्वजन आणि तिचे विरोधक ते परकीय, ते शत्रू असा आपपरभाव आर्यांच्या मनात निश्चित झालेला होता. रामायणात विश्वामित्राने रामाचे साह्य मागितले ते यज्ञरक्षणासाठी. त्याचा विध्वंस राक्षस करीत होते म्हणून तें शत्रू होते, असेच वर्णन आहे.

भूमिनिष्ठेचा उदय :

 'यज्ञ' हे आर्यांचे दैवत होते, वेदमंत्रांनी त्याची पूजा करणे हा त्यांचा धर्म होता आणि वेद, ब्राह्मणे, उपनिषदे, आर्षमहाकाव्ये या संस्कृतग्रंथांतून जोपासली गेलेली ती त्यांची संस्कृती होती. त्यामुळे त्यांचे आपपरभाव या यज्ञधर्मप्रधानसंस्कृतीवर प्रारंभी अवलंबून होते. पण पुढे हळूहळू आर्यांची यज्ञनिष्ठा भूमीचा आश्रय करू लागली. तिने यज्ञाचा आश्रय सोडला असा अर्थ नव्हे. उलट यज्ञीय भूमी, यज्ञपुनीत भूमी, ती आर्यभूमी असाच त्यांचा भाव होता. पण यज्ञाच्या जोडीला भूमिनिष्ठा हळूहळू त्यांच्या मनात दृढावू लागली हे मात्र निश्चित. या भूमिनिष्ठेतूनच राष्ट्रनिष्ठेचा- त्या थोर संघटनतत्त्वाचा- उद्भव होतो. आर्य प्रथम वायव्यप्रांत व पंजाब या प्रदेशांत रहात होते. पुढील काळात ते पूर्वेला सरकू लागले. तेव्हा कुरुपांचाल, कोसल विदेह ही भूमी ते पवित्र मानू लागले. आणि जसजसा त्यांच्या वसाहतीचा विस्तार होऊ लागला तसतसे आर्यावर्त कोणत्या भूमीला म्हणावे याविषयी त्यांच्यात वाद व चर्चा होऊ लागल्या. वेद, ब्राह्मणे, उपनिषदे, धर्मसूत्रे, पुराणे यांत ही चर्चा विपुल प्रमाणात चाललेली दिसून येते. त्याबरोबर हेही दिसून येते की, आर्यावर्ताच्या कक्षा वाढत आहेत. कृष्णमृग जेथपर्यंत विचरतो