पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज-संघटनातत्त्व
२९
 

 प्राचीन भारतीयांनी वंशतत्त्वाचा संघटनेसाठी अवलंब केला नव्हता हे आपण मागल्या प्रकरणात पाहिलेच आहे. आर्य हे नाव वंशवाचक आहे व भारतातील मूळचे द्रविड, असुर, नाग इ. लोक आर्यांहून भिन्न वंशाचे होते, इत्यादी युरोपीय पंडितांची मते अगदी निराधार आहेत, हे ज्ञानकोशकारांनी निर्णायकपणे दाखवून दिले आहे. साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांनी आपल्या 'वेदांतील राष्ट्रदर्शन' या ग्रंथात या प्रश्नाचा सांगोपांग विचार करून तोच निर्णय दिला आहे. तेव्हा याविषयी आता शंकेला जागा नाही. मग आर्यांनी संघटनेसाठी कोणत्या तत्त्वाचा आश्रय केला होता ? त्यांचे आपपरभाव कोणत्या तत्त्वावर ठरत होते ?
 वेदग्रंथ उघडून सहज जरी चाळून पाहिले तरी 'हे इंद्रा, आमच्या शत्रूंचा तू नाश कर, हे अग्ने आमच्या शत्रूच्या नगरांचा विध्वंस कर, देवांनो, शत्रूपासून आमचे रक्षण करा, त्यांच्यावर वज्र फेका, हे पूषन्, आमच्यावर चालून येणाऱ्या शत्रूंचे निर्दाळण कर, देवांनो, आमच्या स्तोत्रांचा, प्रार्थनांचा स्वीकार करा व आमचे शत्रू नष्ट करा.' अशा तऱ्हेच्या प्रार्थना शेकडो सूक्तांत केलेल्या दिसून येतात. या सूक्तांतून शत्रूंविषयीचा जळता द्वेष पावलोपावली प्रगट झालेला दिसून येतो. आता युरोपीय पंडित म्हणतात त्याप्रमाणे हे शत्रू म्हणजे एतद्देशीय मूळच्या कृष्णवर्णीय, कुरूप, रानटी जमाती जर नव्हत तर मग आर्याचे हे शत्रू कोण होते ?

यज्ञविरोधक :

 यज्ञसंस्था, अग्निउपासना, वैदिक संस्कृती व संस्कृत भाषा यांचे द्वेष्टे, यांचे विध्वंसक, यांचे शत्रू ते आर्यांचे शत्रू होते. दस्यु, दास असा त्यांचा सतत निर्देश केलेला आढळतो. पण यज्ञविरोध हे त्यांचे मुख्य लक्षण आहे. ऋग्वेदातील पुढील ऋचा पहा. "अयाजक, हिंसाप्रचुर अशा वाणीने बडबड करणारे पणी, यज्ञकर्माविषयी श्रद्धा नसलेले, स्तोत्रे गाऊन अग्नीची कीर्ती न वाढविणारे, यज्ञकर्म न करता वृथाच कालक्षेप करणारे असे जे पणीनामक दस्यू त्यांना अग्निदेव पूर्णपणे हाकून लावतो. इतकेच नाही तर सर्व देवांत अग्नि हा प्रमुख होत्साता अयाजक अशा दुसऱ्या कित्येक लोकांनाही रसातळी