पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

समुदायांनीसुद्धा – अवलंब केला नाही. पूर्वकाळी धर्म व वंश या तत्त्वांचा प्रभाव फार असे. तेव्हा प्रायः त्याचाच अवलंब बहुतेक समाज करीत. युरोपात राष्ट्र हे तत्त्व गेल्या चारपाच शतकांत उदयास आले आहे. आज बहुतेक देश राष्ट्र म्हणून संघटित होत आहेत. एकभूमी, एक परंपरा व बहुधा एक भाषा हे राष्ट्रधर्माचे समबंध म्हणून मान्यता पावलेले आहेत. प्राचीन भारतीयांनी धर्म, वंश व राष्ट्र यांपैकी कोठल्या एखाद्या तत्त्वाचा अवलंब करून येथला समाज संघटित केला होता काय, हे आता पहावयाचे आहे.

आपपरभाव :

 समाज एखाद्या तत्त्वावर संघटित होतो म्हणजे काय, याचा अर्थ आपण मनाशी निश्चित करून ठेविला पाहिजे. वरीलपैकी कोणतेही तत्त्व अवलंबिले तरी त्या तत्त्वावर अचल निष्ठा समाजातील बहुसंख्य लोकांची असली पाहिजे. धर्मतत्त्वाचा आश्रय केला तर माझ्या धर्माचे ते माझे स्वकीय व इतर सर्व परकीय असा भाव त्यातून लोकांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. संघटनेच्या सामर्थ्याचा उपयोग प्रामुख्याने समाजसंरक्षणासाठी, त्याच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी, व्हावयाचा असतो. आणि तेथेच समाजातील नागरिकांच्या निष्ठेची खरी कसोटी लागत असते. एरवी स्वधर्मीय ते स्वकीय व परधर्मी ते परकीय ही भावना इतक्या तीव्रपणे प्रतीत न झाली तरी समाजाला फारसा धोका नसतो. पण मरणमारणाच्या संग्रामात ही भावना, ही निष्ठा व्यक्तींच्या मनातून अणुमात्र जरी विचलित झाली तरी समाजावर संकट ओढवते. मी स्वकीयांविरुद्ध- स्वधर्मीय, स्वराष्ट्रीय वा स्ववंशीय यांच्या विरुद्ध- कधीही लढणार नाही; निदान परकीयांच्या बाजूने स्वकीयांविरुद्ध रणात उतरणार नाही इतकी तरी कमीत कमी निष्ठा कोणत्या तरी तत्त्वावर असल्यावाचून समाज संघटित होत नाही. त्याला सामर्थ्यं प्राप्त होत नाही. प्राचीन काळी हिंदूंनी कोणत्या तरी निष्ठेची जोपासना करून, म्हणजे आपपरभाव निश्चित करून संघटित सामर्थ्य निर्माण केले होते काय ? समाजाच्या मनात सतत आपपरभाव निश्चित असल्यावाचून आणि तन्निष्ठ जे रागद्वेष ते तीव्र, उत्कट व धारदार झाल्यावाचून समाज संघटनक्षम होऊ शकत नाही आणि त्याला सामर्थ्य लाभत नाही. हिंदूंना हे सामर्थ्य कधी लाभले होते काय ?