पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





हिंदुसमाज - संघटनातत्त्व



 हिंदुसमाज समाज आहे काय, या प्रश्नाचा विचार मागल्या प्रकरणात आपण केला. एवढ्या खंडप्राय देशात परस्परांपासून अत्यंत भिन्न अशा जमातींनी घडलेल्या त्या लोकसमुदायाला दळणवळणाची साधने उपलब्ध नसताना, त्या मागल्या काळी भारतीय आर्यांनी असुर, द्रविड, नाग, इ. जमातींतील श्रेष्ठ, प्रज्ञावंत, कर्त्या पुरुषांनी- एकरूपता प्राप्त करून दिली हे त्यांचे कर्तृत्व अगदी असामान्य असे होय, असे पंडितांचे मत असल्याचे आपण पाहिले. पण त्याचबरोबर आर्याच्या त्या सर्वसंग्राहक धोरणामुळे या समाजाला एकरूपता आली असली तरी त्याला दार्ढ्य आले नाही, संघटित सामर्थ्य निर्माण करण्यास हा समाज असमर्थ झाला हा त्या धोरणावर येणारा आक्षेपही आपण ऐकला. या आक्षेपाचाच आता विचार करावयाचा आहे. म्हणजे हिंदु-समाज समाज असला तरी तो संघटित आहे काय, तो कधी संघटनक्षम होऊ शकेल काय, पूर्वी तो तसा कधी होता काय असा आपला दुसरा प्रश्न आहे.
 कोणताही समाज संघटित व्हावयाचा तर त्याला काही संघटनातत्त्व असले पाहिजे. धर्म, राष्ट्र, वंश ही संघटनातत्त्वे आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासात भिन्नभिन्न लोकांनी आश्रयिलेली आहेत. वर्ग हे नवीन संघटनातत्त्व मार्क्सने प्रतिपादिले होते. पण ते फोल ठरले. त्या तत्त्वाचा कधीच कोणी- मार्क्सवादी