पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
२५
 

सांगितलेच आहे. इंडोनेशिया, दक्षिण अमेरिका यांचे असेच आहे. आरब एकवंशीय व एकधर्मीय असूनही सर्व आरब भूविभागाचे त्यांना एक राष्ट्र करता आले नाही. या बाबतीत प्राचीन काळी चीनला व अर्वाचीन काळी अमेरिकेलाच फक्त यश आले आहे. भारतीय आर्यांचे यश किती दुर्मिळ कोटीतले आहे हे यावरून ध्यानात येईल.
 प्राचीन आर्यांना हे अलौकिक यश आले यामुळे त्यांचे समाजशास्त्र जगातील सर्व समाजशास्त्रांपेक्षा श्रेष्ठ होय असे पंडितांचे मत आहे. पण या समाजशास्त्राचा असा गौरव करणाऱ्यांनीच त्यांतील एक महान् वैगुण्यही दाखवून दिले आहे. डॉ. केतकर म्हणतात, 'व्यापकतेच्या दृष्टीने जे समाजशास्त्र अत्यंत बलवान ठरले तेच समाजशास्त्र दार्ढ्याच्या दृष्टीने अगदी दुर्बल ठरले आहे, हे देखील त्याबरोबरच कबूल केले पाहिजे. अत्यंत भिन्न समाज एक छत्राखाली आणल्यामुळे, आणि ते देखील सक्तीने न आणता खुशीने आणले गेल्यामुळे हिंदुसमाज हा एक भिन्नस्वरूपी लोकांचा समुच्चय बनला आहे व संघटित कार्य करण्यास असमर्थ झाला आहे, अशी भीती पुष्कळांना बाटू लागली आहे.' (प्राचीन महाराष्ट्र शातवाहनपर्व, पृ. २८४. ज्ञानकोश प्रस्तावनाखंड, विभाग १ ला, पृ. ३८१) प्रारंभीच 'हिंदुसमाज समाज आहे काय ?' हा प्रश्न विचारला आहे त्यात हीच भीती व्यक्त झालेली आहे. एका हिंदूवर आघात झाला तर सर्व हिंदू खवळून उठतात असे कधी घडतच नाही, असे दिसते. निदान गेली हजार वर्षे तरी इतिहास कंठरवाने हेच सांगत आहे. मग प्रश्न असा येतो की त्यापूर्वी काय होते ? पूर्वीपासूनच संघटित कार्य करण्यास हा समाज वा हा लोकसमुदाय असमर्थ होता काय ? संभूयसमुत्थान असे त्याला कधी जमलेच नाही काय ? जमले असले तर त्या वेळी त्याला कोणी संघटित केले होते ? त्यांना यश कशामुळे आले ? या प्रश्नांचा विचार आता केला पाहिजे. तो पुढील प्रकरणात करू. तत्पूर्वी या प्रकरणात आर्यांच्या राष्ट्रघडणीच्या प्रयत्नांचे जे वर्णन केले आहे त्यांतून जे काही महत्त्वाचे सिद्धांत हाताशी लागतात ते पाहू :
 (१) येथे सर्वांना रहावयाचे आहे हे आर्यनेत्यांनी निश्चितपणे ठरविले होते. (२) त्यासाठी सर्व भारतीय समाज एकरूप झाला पाहिजे असा त्यांचा बुद्धिनिश्चय झाला होता. (३) या ध्येयाच्या आड वर्ण, वंश, संस्कृत-