पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

असता तर दोनचार शतकांतच एकाची संस्कृत भाषा दुसऱ्याला दुर्बोध झाली असती. म्हणून अखिल भारतीय भाषेच्या स्वैरविकासाला नियंत्रण घालणे हे सांस्कृतिक ऐक्यवर्धनाच्या दृष्टीने अगत्याचे होते. यामुळे संस्कृत भाषा बंदिस्त झाली खरी पण म्हणूनच ती अमर झाली. शंकराचार्यांना ही बैठक लाभली म्हणूनच बत्तीस वर्षांच्या अल्पावधीत त्यांना भारतावर आपल्या तत्त्वज्ञानाची मुद्रा ठोकणे शक्य झाले. कालिदास, शुद्रक, भवभूती यांना अखिल भारताचे कवी होण्याचा मान मिळाला तो पाणिनी मुळेच. आयुर्वेदामधील चरक हा पंजाबचा, सुश्रुत हा बनारसचा, वाग्भट हा सिंधमधला आणि वृंद हा महाराष्ट्राचा. पण सर्वांची एक आयुर्वेदविद्या झाली व ती भारतमान्य झाली ती देववाणीमुळेच. मनुयाज्ञवल्क्यनारदादि स्मृतिकारही सर्व आर्यावर्तात मान्यता पावले ते या गीर्वाण भारतीच्याच आश्रयाने. याचा अर्थ असा की अखिल भारताचे सांस्कृतिक ऐक्य टिकून राहिले त्याचे बव्हंशी श्रेय पाणिनीच्या नियमबद्ध संस्कृत भाषेलाच दिले पाहिजे.

व्यापकता व सामर्थ्य :

 पृथ्वीवर निरनिराळे भूप्रदेश निसर्गाने निर्माण केले आहेत. त्यांचे देश किंवा राष्ट्र यात रूपांतर कोण करते ? ते मानव समाजांचे कार्य आहे. जर्मनीच्या ज्या सीमा आहेत त्या काही निसर्गाने निर्माण केल्या नाहीत. तेथले लोक स्वतःला एक समाज, एक राष्ट्र मानतात, तेथल्या परंपरांचा अभिमान धरतात म्हणून जर्मनी हे राष्ट्र झाले. अखिल युरोप हा ख्रिस्तधर्मीय आहे. पण हे सर्व लोक आपल्याला एक समाज मानीत नाहीत म्हणून सर्व युरोप हे राष्ट्र झाले नाही. हिंदुस्थान जवळ जवळ युरोपासारखेच एक खंड आहे. प्राचीन भारतीयांच्या एकीकरणाच्या प्रयत्नाला यश आले नसते तर येथे आज युरोप- सारखीच अनेक राष्ट्रे दिसली असती. ती तशी दिसत नाहीत, अखिल भारत एक देश, एक राष्ट्र आहे ही जाणीव सर्व हिंदवासीयांच्या मनात दृढ आहे, याचे श्रेय त्या प्राचीन आर्यांना म्हणजे द्रविड, असुर, नाग, दैत्य, यांनी जो एक श्रेष्ठ वर्ग घडविला त्याला आहे. हे यश फार मोठे आहे. अफगाणिस्तान- पासून मोरोक्कोपर्यंत मुस्लीमांचे साम्राज्य कित्येक शतके टिकून होते. पण या सर्वं भूप्रदेशाचा एक देश स्वप्नातही अस्तित्वात आला नाही. युरोपचे वैर