पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
२३
 

ठेविले आणि त्याचे श्रवण नाना भाषांमध्ये करविण्याची सोय बहुजनांसाठी केली. त्यामुळे अखिल भारताचे सामरस्यही साधले आणि सर्व थरांत धर्मप्रसार करण्याचे उद्दिष्टही साधले.

पाणिनीचे दृढबंधन :

 संस्कृत भाषेवर येणाऱ्या आणखी एका आक्षेपाचा विचार येथे केला पाहिजे. इ. पू. सातव्या शतकात पाणिनीने संस्कृत भाषेचे व्याकरण लिहिले आणि तिला नियमबद्ध करून टाकली. त्या वेळी ती भाषा केवळ ग्रांथिक स्वरूपातच होती असे म्हणतात. काही पंडित तर असे म्हणतात की तिला पाणिनीने नियमबद्ध केले म्हणूनच ती मृत झाली. इंग्रजी, फ्रेंच इ. भाषांची व्याकरणे रचल्याला आता शतके उलटून गेली आहेत. तरी त्यांना मृतकळा आलेली नाही, उलट त्या विकासच पावत आहेत. मराठी, हिंदी याही व्याकरणबद्ध झाल्याला शतक होऊन गेले. तरी त्यांच्यावर वार्धक्य आल्याची चिन्हे दिसत नाहीत. तेव्हा हा विचार अगदी हास्यास्पद म्हणून सोडून दिला पाहिजे. पण पाणिनीने संस्कृत भाषेला नियमबद्ध केले हे खरेच आहे. पण त्यामुळे हित झाले की अहित ? पाणिनीच्या उत्तर काळात दोन हजार वर्षे दळणवळणाची साधने नसताना अखिल भारतीय शास्त्रीपंडित एकमेकांशी संवाद करू शकले व अखिल भारतातील धर्मकल्पनांमध्ये सुसंवाद राखू शकले ते पाणिनीच्याच आश्रयाने हे आपण विसरता कामा नये. संस्कृत भाषेची ही अखिल भारतीय बैठक लाभल्यामुळेच तत्कालीन भारतीय विद्यापीठांत भारतातील सर्व प्रदेशांतील विद्यार्थ्यांना विद्याध्ययन करता आले. पंडितांना धर्मचर्चा करिता आली आणि इतिहासपुराणांना रामकृष्णांची चरित्रे आदर्श म्हणून उभी करून समाजाला स्फूर्ती देता आली व परंपरांचा अभिमान टिकविता आला. प्रा. द. के. केळकर यांनी आपल्या 'संस्कृतिसंगम' या ग्रंथात याविषयी अत्यंत उद्बोधक असे विवेचन केले आहे. त्याचा भावार्थ असा : संस्कृत भाषा हे भिन्नभिन्न प्रांतीयांच्या विचारविनिमयाचे व म्हणूनच सर्वांना एकसूत्रात गोवणारे प्रभावी साधन होऊन बसले. हे साधन शाश्वत व टिकाऊ बनवावयाचे तर ते शिस्तीच्या नियमांनी बांधून वज्रलेप करणे अवश्य होते. पाणिनीने ते कार्य केले व सर्व प्रांतीच्या विद्वानांनी ते मान्य केले. संस्कृत भाषेचा विकास हा त्या त्या प्रांतावर सोपविला