पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

तिची कामगिरी याहीपेक्षा महत्त्वाची आहे. नेहमी असे सांगितले जाते की बौद्ध व जैन धर्मांनी संस्कृत भाषा सोडून देऊन पाली, अर्धमागधी या प्राकृत भाषांचा आश्रय केला म्हणून बहुजन समाजाला त्यांचा धर्मोपदेश सुलभ झाला व त्या धर्मपंथांकडे तो समाज आकर्षिला गेला. पण या विधानाला कितपत अर्थ आहे ते तपासून पाहिले पाहिजे. कारण असे की जोपर्यंत बहुजनसमाज साक्षर नाही तोपर्यंत त्याला संस्कृतात लिहिले काय किंवा प्राकृतात लिहिले काय, सारखेच आहे. धर्मज्ञानाचे त्याचे मुख्य साधन म्हणजे श्रवण आणि धर्मगुरु त्याच्या भाषेत जर धर्मप्रवचन करीत असतील तर मूळ ग्रंथ कोणत्या भाषेत आहे याची चिंता करण्याचे त्याला कारण नाही. पुराणांनी नेमके हेच केले. व्यासांनी, किंवा सौताने पुराणे लिहिली ती संस्कृतात, पण पुराण सांगणारी एक स्वतंत्र संस्था निर्माण करून हे संस्कृतातले धर्मज्ञान सर्व समाजात प्रस्त करण्याची त्यांनी व्यवस्था करून टाकली. यामुळे दुहेरी कार्य साधले. पुराणे हे धर्मग्रंथ संस्कृतात रचल्यामुळे त्यांना अखिल भारतीय मान्यता मिळाली. अन्यथा प्रत्येक प्रांताची पुराणे निराळी होऊन भारतवर्षाच्या एकतेचा भंग झाला असता. शिव-विष्णु, राम कृष्ण, गंगा-यमुना, काशीरामेश्वर, एकादशी-शिवरात्र यांचे जे महत्त्व आज पंजाबमध्ये आहे तेच बंगालमध्ये आहे, तेच गुजराथेत व केरळमध्ये आहे. रामायण- महाभारत, हे ग्रंथ संस्कृतात नसते तर आज प्रत्येक भारतीयाचा रामकृष्ण या नावांनी जो श्वासोच्छ्वास चालतो तो चालला नसता. आणि सर्व भारत हा एक देश आहे ही भावना टिकून राहिली नसती.
 तुलनेने याचा विचार केला तर तो जास्त उद्बोधक होईल. पाली, अर्धमागधी या भाषांत लिहिलेल्या ग्रंथांचे वर्चस्व आज भारतीय समाजावर किती आहे व संस्कृतात लिहिलेल्या ग्रंथाचे किती आहे याची तुलना प्रत्येकाने करून पहावी. बुद्धमहावीर यांच्या अवतारकार्यानंतर भारतात त्यांच्या मतांचा प्रसार किती झाला ? शिकंदराची स्वारी भारतावर झाली तेव्हा पश्चिम आणि वायव्य या बाजूच्या प्रांतांत बुद्धाचे नावही माहीत नव्हते. तरी या वेळी त्या धर्माच्या उद्याला तीनशे वर्षे होऊन गेली होती. मग बहुजनांच्या भाषेत ग्रंथ लिहून त्या पंथांना काय मिळाले? त्यांनी त्या भाषांचा आश्रय केला तरी भारतावर वर्चस्व महाभारत, रामायण, भागवत यांचेच निरपवाद, अखंड कायम राहिले. त्याचे कारण म्हणजे पुराणप्रवचनकीर्तन या हिंदूंच्या संस्था. हिंदूंनी मूळ ग्रंथ संस्कृतात