पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
२१
 

त्याचे वर्णन आहे. असा हा रुद्र शिवाशी एकरूप झाल्यामुळे शिव ही देवता सर्वश्रेष्ठ व सर्ववंद्य ठरली. एकराष्ट्र करण्याचा आर्यांचा निश्चय किती दृढ होता हे यावरून ध्यानात येईल. शिव ही अनार्य देवता. पण तरीही तिचा यांनी स्वीकार केला इतकेच नव्हे तर आपल्या मूळच्या सर्व देवतांपेक्षा तिला श्रेष्ठ असे स्थान दिले. आणि याहीपुढे जाऊन आर्यांची परमपूज्य जी देवता म्हणजे विष्णु तिचे व शिवाचे अद्वैत प्रस्थापिले. 'शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिवः।' ही उक्ती प्रसिद्धच आहे. शिव व विष्णु यांत भेद करील तो नरकाला जाईल असे पुराणात वारंवार प्रतिपादिलेले आहे. आणि या प्रतिपादनाला पूर्ण दृढता यावी म्हणून हरिहर ही एकच मूर्तीही त्यांनी कल्पिली. ब्रह्माविष्णुमहेश यांचा समावेश केलेली दत्तात्रयमूर्ती आणि शिव, विष्णु, सूर्य, देवी व गजानन यांचे शंकराचार्यांनी केलेले पंचायतन यांच्या मागे हे एकीकरणाचे धोरण असल्याचे स्पष्ट दिसते. विष्णुसहस्रनाम व शिवसहस्रनाम यांची रचना याच हेतूने झालेली आहे, हे तर उघडच आहे. सर्व दैवते, चराचरातील सर्व तेजाचे अंश एकेका देवतेत या सहस्रनामानी समाविष्ट केलेले आहेत आणि अंती या दोन्ही देवतांचे अद्वैत साधले आहे.
 बदरीनाथ, जगन्नाथ, रामेश्वर व द्वारका या चार धामांच्या यात्रा; गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु, कावेरी या सात अखिल भारतातल्या पवित्र नद्यांची स्नाने; बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन; अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती या पुण्यनगरींच्या यात्रा यांचा पुराणांनी जो आग्रहाने उपदेश केला आहे व त्यांपासून मिळणाऱ्या थोर पुण्याचे जागोजाग जे वर्णन केले आहे ते अखिल भारतीय समाजाला एकरूप देण्याच्या हेतूनेच होय यात शंका नाही. या सर्वसंग्राहकतेमुळेच वैदिक आर्यांनी मनापुढे ठेवलेले राष्ट्र निर्मितीचे ध्येय सफल झाले असे बहुतेक सर्व पंडितांचे मत आहे.

संस्कृत आणि प्राकृत :

 शेवटी एकीकरणाच्या प्रक्रियेतील संस्कृत भाषेने केलेल्या कार्याचे महत्त्व पाहून हा विचार संपवू. वैदिककाळातच आसेतुहिमाचल संस्कृत भाषा वरिष्ठ वर्गात, शास्त्रीपंडितांत रूढ झाली होती हे वर सांगितलेच आहे. पुराणकाळातली