पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

हे न ठरविता संग्रहक्षमता हे ठरविले. म्हणजे परमेश्वरविषयक तत्त्वज्ञानात 'माझे खरे व तुझे खोटे व ते तुझे नष्ट केले पाहिजे' ही भूमिका न पत्करता त्यांनी सर्वसंग्रहाची वृत्ती अवलंबिली. गीतेच्या दहाव्या अध्यायात 'जे जे श्रीमदूर्जित आहे त्यात माझेच तेज आहे' हा जो विचार श्रीकृष्णांनी सांगितला तो या दृष्टीनेच सांगितला आहे.
 आर्यांचे जसे इन्द्रचंद्रादि देव होते तसेच येथल्या मूळच्या अर्धसंस्कृत, असंस्कृत व रानटी लोकांचेही नाग, वाघ, सिंह, गरुड, मगर, पिंपळ इ. देव होते. ही दैवते तशीच पृथकपणे राहू दिली असती तर येथे देशभर पसरलेले सहस्रो मानवपुंज एकत्र सांधून त्यांचा एक समाज घडविण्याचे आर्यांचे भव्य स्वप्न साकार झाले नसते. या दैवतांवर प्रारंभीच आघात करणे हेही शक्य नव्हते. त्याने अकारण वैराग्नी निर्माण झाला असता. म्हणून श्रीकृष्णांनी सांगून टाकले की, 'या सर्व माझ्याच विभूती आहेत.' ते म्हणाले, 'रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्षराक्षसांमध्ये वित्तेश मी आहे, सर्पांचा वासुकी मीच, नागांचा अनंत मीच, दैत्यांचा प्रल्हाद मीच, अश्व, मकर, कामधेनू, मृगेन्द्र, वैनतेय, जाह्नवी सर्व मीच आहे.' यांमध्ये, राक्षस, यक्ष, दैत्य यांचा व मगर, गरुड, सिंह, यांची पूजा करणाऱ्या अर्धरानटी लोकांचाही श्रीकृष्णांनी समावेश करून त्यांना आर्यांच्या पदवीला नेऊन ठेविले आहे. आर्यांच्या या उदार, सहिष्णु व सर्वसंग्राहक धोरणामुळेच सर्व हिंदुसमाज एकत्र बांधला गेला.

शिव आणि रुद्र :

 शिव या दैवताची कथा अशीच आहे. रुद्र ही वेदातली देवता. आणि महादेव ही पंडिताच्या मते, अनार्यांची देवता होय. भूत, पिशाच्च हे त्याचे गण, त्याची स्मशानातली राहणी, कातड्याची वस्त्रे, चिताभस्माचे लेपन यांवरून तो विचार खरा वाटतो. पण आपल्या सर्वांना एकजीव व्हावयाचे आहे, हा आर्यांचा बुद्धिनिश्चय झाला होता. आणि दैवते, श्रद्धास्थाने, ध्येये एकरूप झाल्यावाचून समाज एक होत नाही हे त्यांनी जाणले होते. म्हणून महादेव व रुद्र यांना त्यांनी अभिन्न करून टाकले. गीतेतील विभूतियोगासारखाच यजुर्वेदातील रुद्राध्याय आहे. सर्व चराचरामध्ये रुद्रच भरून राहिला आहे, पशू, पक्षी, प्राणी, वनस्पती यांचा तो पती आहे, सूर्य तोच आहे, विष्णु तोच आहे, असे