पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
१९
 

अशी श्रद्धा दृढमूल होऊन गेलेली आहे. वास्तविक या मूळच्या भिन्न जमातींच्या भिन्न काळच्या देवता असल्या पाहिजेत. पण त्यांचे मूळ रूप पुराणांनी इतके पुसून टाकले आहे की त्यांच्या भिन्नपणाची शंकासुद्धा आता कोणाच्या मनात उरलेली नाही. या विष्णूलाच शतपथ ब्राह्मणात यज्ञ म्हटले आहे. व वेदांत सूर्य म्हटले आहे. त्याला मान्यता देऊन पुराणांनी यज्ञाचे सर्व पावित्र्य व वैभव विष्णूमध्ये समाविष्ट करून घेऊन जुन्या परंपरेचा धागा अतूट राखला आहे. नारायण, वासुदेव या मुळात स्वतंत्र देवता होत्या व त्यांचे स्वतंत्र पंथही होते. कृष्ण या नावाविषयी तर फारच वाद आहेत. पूर्व काळी या नावाचे अनेक पुरुष होऊन गेले. पण पुराणांनी नारायण, वासुदेव, कृष्ण, गोविंद यांचे व विष्णूचे रूप पूर्ण अभिन्न करून टाकले. गीताकार श्रीकृष्ण व गोकुळातला गोपालकृष्ण हे दोघे अनेकांच्या मते अगदी भिन्न होत. पण पुराणांनी ते मानले नाही. गोकुळातला कृष्ण हा आभीर जमातीचा एक वंद्य असा नायक असण्याचा पूर्ण संभव आहे. पण पुराणांनी या सर्वांना एका विष्णुरूपात विलीन करून भारतीय जनतेच्या मनात एक सर्वव्यापी अमर असे श्रद्धास्थान निर्माण करून ठेवले. लोकसंग्रहाचा हा प्रयत्न अगदी असामान्य असा आहे.
 स्वतः श्रीकृष्णांनी लोकसंग्रहाचा असाच एक फार मोठा प्रयत्न गीतेच्या दहाव्या अध्यायात केला आहे असे पंडितांचे मत आहे. 'गीतातत्त्वविमर्श' या आपल्या ग्रंथात 'मम तेजोऽशसंभवम्' या पहिल्याच प्रकरणात प्रा. माटे यांनी त्याचे फार चांगले विवेचन केले आहे. त्याचा सारार्थ पुढे देतो.

संग्राहक धोरण :

 जयिष्णु आर्य लोक या भूमीत सर्वत्र पसरू लागताच हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेल्या द्वीपाचे एकराष्ट्र करावयाचे हा त्यांचा निश्चय झाला. त्यांनी येथली सर्व भूमी आक्रमिली पण केवळ आक्रमण करून ते स्वस्थ बसले असते तर कालांतराने त्यांची शक्ती लुळी पडली असती. पण 'आपणा सर्वांना येथे रहावयाचे आहे व या सर्वांचा एक समाज बनवावयाचा आहे' या विचाराने त्यांनी आक्रमक वृत्ती सोडून देऊन देवघेवीचे धोरण आखले. आणि त्याअन्वये धर्माचे व तत्त्वज्ञानाचे स्वरूप ठरविताना त्यांनी त्याचे लक्षण व्यवच्छेदकता