पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

झाला. या घोर संकटातून भारतीय समाजाला वाचविण्यासाठी इतिहास- पुराणांचा अवतार झाला आहे.

नवी श्रद्धास्थाने :

 वेद, यज्ञ व इंद्रादि देवता या श्रद्धास्थानांवरून समाजाची निष्ठा ढळली आहे हे पाहताच पुराणांनी त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न न करता नवी श्रद्धास्थाने निर्माण केली. ती म्हणजे शिव, विष्णु, ब्रह्मा, राम आणि कृष्ण ही होत. इतिहासपुराणांचे प्रामुख्याने हे कार्य आहे. समाजाची श्रद्धास्थाने जेवढी एकरूप तेवढा समाज एकरूप होतो हे तत्त्व जाणूनच पुराणांनी या देवतांविषयी दीर्घकथाकाव्ये व आख्याने लिहून अखिल भारतात त्यांचा अत्यंत कसोशीने प्रसार केला. त्याला यश किती आले हे आपण पाहतोच आहो. अखिल भारतात असा एक प्रदेश नाही की जेथे शिवाची पूजा केली जात नाही. असा एक समाज नाही की जो रामकृष्णांची भक्ती करीत नाही. विष्णु या शब्दाचा मूळ अर्थ व्यापणारा असा आहे. अखिल भारताला व्यापून या देवतने तो शब्द सार्थ केला आहे. गणेश, ब्रह्मा याही देवतांची पुराणे लिहून त्यांनाही पुराणांनी भारतीयांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करून दिले. अशा रीतीने अग्नि, इंद्र, मित्र, वरुण, पवमान इ. वैदिक देवतांच्या स्थानी ब्रह्माविष्णुमहेशादि देवता स्थापन करून पुराणांनी अखिल भारताला पुन्हा एका नव्या रज्जूने बद्ध केले व सुरू झालेल्या विघटनेला आळा घातला.
 पण याहीपेक्षा पुराणांनी मोठे कार्य केले ते म्हणजे या सर्व देवतांच्या ऐक्याची प्रस्थापना. एका समाजात किंवा संस्थेत दोन परस्परविरोधी, प्रतिस्पर्धी नेते निर्माण झाले की तो समाज किंवा ती संस्था भंग पावते हा आपला नित्याचा अनुभव आहे. लोकसमुदायाच्या बाबतीत हे शतपटीने खरे आहे. त्यामुळेच सर्व देवतांचे अद्वैत प्रस्थापित करण्याचा पुराणांनी अट्टाहासाने प्रयत्न केलेला दिसतो.
 एका विष्णु या देवतेचा इतिहास पहिला तरी पुराणांच्या या प्रयत्नाचे स्वरूप ध्यानी येईल. हिंदूंचे मत्स्यकूर्मवराहादि दशावतार प्रसिद्ध आहेत. ते सर्व विष्णूचेच अवतार आहेत हे हिंदुधर्मग्रंथांनी इतक्या आग्रहाने व इतक्या ठिकाणी प्रतिपादले आहे की त्याविषयी आता हिंदुमात्राच्या मनात अविचल